लालकिल्ला : खरगे विरुद्ध मोदी लढाईचे काय झाले? 

‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी (leaders)अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात.


भाजपला काही न करता लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे (leaders)लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी झाली पाहिजे. मग, मोदी प्रचाराला बाहेर नाही पडले तरी चालेल. २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशीच झालेली होती. त्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये बरेच रामायण घडले होते. बंडखोरांचा ‘जी-२३’ गट निर्माण झाला, एकेक नेते-प्रवक्ते काँग्रेसला सोडून गेले. आता काँग्रेस एक वर्तुळ पूर्ण करून पाच वर्षांपूर्वीच्या बिंदूवर येऊन ठेपला असावा असे दिसते. हळूहळू यंदाही लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
खरे तर ही निवडणूक भाजपसाठी सहजसोपी नाही. ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी अजूनही देशभर एकत्र सभा घेतल्या तर विरोधक भाजपला तगडी लढत देऊ शकतात. दिल्लीमध्ये ‘आप’चे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याची घाई भाजपला महागात पडू शकते. या वेळी दिल्लीत सर्वच्या सर्व सात जागा भाजपला मिळतील असे गृहीत धरता येत नाही. भाजपने केजरीवालांना ४ जूननंतर तुरुंगात टाकले असते तर दीड वर्षांनी होणाऱ्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिक लाभ मिळाला असता अशी चर्चा दिल्लीत होऊ लागली आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच केजरीवालांना अटक करून दिल्लीतील वातावरण भाजपने ‘आप’साठी काही प्रमाणात का होईना अनुकूल बनवले आहे. दिल्लीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील आप व काँग्रेसच्या मतांची एकत्रित टक्केवारीदेखील भाजपच्या मतांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे. हे मतांच्या आकडयांचे गणित मांडले तरी भाजपला सातही जागा जिंकणे फारसे अवघड होऊ नये. पण केजरीवालांना अटक करून दिल्लीकरांच्या मनात केजरीवालांबद्दल सहानुभूती निर्माण केलेली आहे. केजरीवाल हे राष्ट्रीय नेते झालेले आहेत. त्यांच्या अटकेमुळे निर्माण झालेली सहानुभूती फक्त दिल्लीपुरती सीमित राहील असे नव्हे. एका राज्यात वातावरण बदलले तर अन्य राज्यांमध्ये बदलणार नाही असे मानू नये.
ही निवडणूक भाजपला एकहाती जिंकता येत असती तर आघाडयांचा खेळ भाजपने केला नसता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांशी वैर पत्करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांसाठी पायघडया घालाव्या लागल्या नसत्या. भाजप आत्ता फक्त मोदींच्या करिश्म्यावर तग धरून आहे. लोकसभा निवडणुकीतून मोदी हा घटक काढून टाका, भाजपला कदाचित बहुमताचा आकडा गाठणेही कठीण होऊ शकेल, हा युक्तिवाद भाजपमधील नेतेसुद्धा कदाचित मान्य करू शकतील. अर्थात, भाजपच्या नेत्यांनी मोदींचे अस्तित्व मान्य केले नाही तर त्यांना कुठला तरी दुसरा पक्ष शोधावा लागेल हे निश्चित. अशा परिस्थितीत मोदी विरुद्ध राहुल अशी लढाई झाली तर फायदा भाजपचा आणि मोदींचा असेल. त्यामुळे काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवत आहोत असे मानून प्रचार केला तर २०१९ ची पुनरावृत्ती टाळता येऊ शकेल. पण ‘इंडिया’ने लोकसभेची निवडणूक जिंकली तर पंतप्रधान कोण होईल, या प्रश्नावर राहुल गांधींनी, ‘इंडिया’तील घटक पक्ष चर्चेनंतर ठरवतील असे उत्तर दिले. इथे काँग्रेसची धोरणातील संदिग्धता उघड होते. ‘इंडिया’तील नेत्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या नावावर सहमती झाली असताना राहुल गांधींनी गोंधळात टाकणारे विधान कशासाठी केले, हे काँग्रेसला कळू शकेल. मोदींच्या विरोधात ‘इंडिया’च्या वतीने तगडा उमेदवार म्हणून खरगे हाच उत्तम पर्याय असताना खरगेंना मागे का ढकलले जात आहे, हेही काँग्रेसलाच कळू शकेल. लोकसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये खरगेंऐवजी राहुल गांधी केंद्रस्थानी आले तर ‘इंडिया’चा डाव फसेल हे निश्चित!


मोदींच्या समोर खरगे उभे राहिले तर मोदींना गांधी कुटुंबाऐवजी खरगेंवर बोलावे लागेल. मोदी वा भाजपच्या कोणत्याही नेत्याला खरगेंवर मर्यादा सोडून टीका करता येणार नाही. खरगेंचे वय पाहता तेच मोदींना शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगू शकतील. खरगे भ्रष्ट नाहीत. त्यांच्यावर घोटाळयाचा आरोप नाही. खरगे कधीही हीन भाषेत कोणाबद्दलही बोलत नाहीत. खरगेंनी राजकारणाचा स्तर कधीही खालावू दिलेला नाही. कधी कधी संसदेतील मोदींची भाषणे ऐकल्यावर राजकारणाच्या स्तराचा हा प्रश्न अनेकदा पडतो! पण मोदींना खरगेंवर वैयक्तिक टीका करता येणार नाही. वैयक्तिक टीका करता आली नाही तर मोदींच्या प्रचाराला एकप्रकारे कोंडून घातल्यासारखे ठरेल. शिवाय, खरगे आकाशातून पडलेले नाहीत, त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात घालवलेला आहे. शासन-प्रशासन दोन्हीचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी खासगी आयुष्यात झेललेले अनेक घाव मोदीच काय भाजपमधील कोणत्याही नेत्याच्या वाटयाला आले नसतील. तिथेही ‘मी कष्ट करून इथवर येऊन पोहोचलो’, असा दांभिक प्रचार भाजपला करता येणार नाही. मोदी आणि भाजपला निवडणूक प्रचारात एका परिघात अडवण्याची ताकद खरगेंकडे असताना काँग्रेस पुन्हा राहुल गांधींना प्रचाराच्या मध्यभागी का आणू पाहात आहेत, हे कोडेच म्हणता येईल.
‘इंडिया’तील नेत्यांच्या बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव अशा अनेक नेत्यांनी ‘इंडिया’च्या अध्यक्षपदी खरगेंचे नाव सुचवले होते. या बैठकीआधी दिल्लीमध्ये जवाहर भवनमध्ये खरगेंच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी, ‘द्रमुक’चे नेते टी. आर. बालू आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनीदेखील ‘इंडिया’चे नेतृत्व आणि सत्ता मिळाली तर खरगे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतील असे सुचवले होते. खरगेंनी ऐंशी पार केली असली तरी त्यांनी अजून राजकीय शिखर गाठलेले नाही असे या नेत्यांचे म्हणणे होते. या कार्यक्रमाला सोनिया गांधीही होत्या.

हेही वाचा :

धोनीने प्रथमच फलंदाजीला येत जिंकला ‘हा’ खास पुरस्कार

गौतमी पाटीलच्या नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू