महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे (csk)कप्तानपद सोडलं आहे, त्याच्याजागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे.
ऋतुराज गायकवाड 2019 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून (csk)खेळत आहे. त्याने 52 आयपीएल सामने खेळले आहेत. ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या 14व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं होतं.
महेंद्रसिंग धोनीचा विश्वासू शिलेदार झालेल्या ऋतुराज गायकवाडच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
रणजी ट्रॉफीचा तो सामना ऋतुराजच्या चांगलाच लक्षात आहे. 2015-16 रणजी हंगामात महाराष्ट्राची झारखंडविरुद्ध दिल्ली इथे मॅच होती. झारखंड संघाचा मेन्टॉर म्हणून दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी होता.
धोनीसमोर चांगलं खेळण्याचा ऋतुराजचा इरादा होता. मात्र या प्रयत्नात झारखंडच्या वरुण आरोनचा उसळता चेंडू ऋतुराजच्या बोटावर जाऊन आदळला. महाराष्ट्राचा अनुभवी खेळाडू केदार जाधवने ऋतुराजला खेळता येतंय का बघ, असं सांगितलं.
ऋतुराजने दुखऱ्या बोटासह बॅटिंग करायचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळानंतर दुखणं वाढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला. त्यानंतर जे घडलं ते ऋतुराज विसरू शकणार नाही.
लंचवेळी महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजच्या दुखापतीविषयी विचारायला आला. धोनीने ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटाला लावण्यात आलेल्या प्लॅस्टरवर ‘गेट वेल सून’ संदेश लिहिला.
2019मध्ये चेन्नईने 20 लाख रुपये या बेस प्राईजला ऋतुराजला ताफ्यात समाविष्ट केलं. महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर ऋतुराजने त्या भेटीविषयी विचारलं- त्यावर धोनी म्हणाला, “मला अगदी स्पष्ट आठवतंय. तू प्रतिभावान खेळाडू आहेस, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत राहा”.
भारतीय क्रिकेटच्या आधुनिक शिलेदारांपैकी एक अशा महेंद्रसिंग धोनीने लक्षात ठेवलेला ऋतुराज आता जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या पसंतीचा होऊ लागला आहे.
सरळ बॅटने फटके खेळण्याची शैली, पारंपरिक वाटेल अशा पद्धतीने इनिंग्जची बांधणी, हवेत चेंडू मारण्याऐवजी खणखणीत ग्राऊंडस्ट्रोक, भागीदाऱ्या करण्याची हातोटी, चपळ क्षेत्ररक्षक, यश साजरा करतानाही शांत असं सेलिब्रेशन यामुळे ऋतुराज आता क्रिकेटरसिकांचा आवडता होऊ लागला आहे.
ऋतुराज कुठे घडला?
ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.
मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.
हेही वाचा :
कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली
मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…
मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?