सळसळणारा उत्साह आणि रस्त्यावर उतरलेला जनसागर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हे वरूण राजा, फक्त आज एक दिवस तू विश्रांती घे, उघडीप दे! अशी विनंती करत, प्रार्थना करत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आज सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत(Procession) सहभागी झाली. गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक तरुण मंडळे, तालीम संस्थांच्या इमारती, रस्त्यावर उभारलेल्या भव्य मंडपात गणेशोत्सवाचा सळसळणारा उत्साह होता. हाच उत्साह घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

प्रशासनाने निश्चित केलेल्या पारंपरिक मिरवणूक(Procession) मार्गावर श्री विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी भक्तिमय जनसागर उसळला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारनंतर एकसंघ भव्यता प्राप्त झाली. पारंपारिक वाद्ये, लेझीम, मर्दानी खेळ, झांज आणि ढोल पथके, बॅन्जो, ढोल ताशा, सनई चौघडे, धनगरी ढोल, टाळ मृदुंग, हलगी, अशा विविध प्रकारच्या वाद्यांसह निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी झिम्मा आणि फुगडी चा फेर धरून परंपरेचा, संस्कृतीचा एक प्रकारचा कल्लोळ उडवून दिला होता. या मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती. एकूणच असा हा अभूतपूर्व उत्साहाचा कल्लोळ सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री, मध्यरात्री आणि पहाटेच्या पुढेही चालूच होता.

सोमवारी अधून मधून दिवसभर पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे मंगळवारच्या विसर्जन निर्मितीमध्ये पावसाचा व्यत्यय येणार असे वातावरण होते. मंगळवारी सकाळी कोणत्याही क्षणी पाऊस येईल असे वाटत होते. तथापि वरूण राजाने दुपारपर्यंत तरी उघडी पद दिली होती त्यामुळे मिरवणुकीला एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झाले होते. सकाळी आठ वाजता तुकाराम माळी तालीम संस्थेचा गणपती मिरवणूक मार्गावर आला. हा या निवडणुकीतील पहिला गणपती. या तालमीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उद्घाटनाला आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त वगैरे उपस्थित होते.

मिरवणूक मार्गावर अनेक उपमार्ग आहेत. तेथून मुख्य मिरवणूक मार्गात सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रमांक दिले होते. कोणत्या उपमार्गावर किती गणपती मुख्य मिरवणूक मार्गात सोडायचे याचे प्रमाण निश्चित करण्यात आले असल्यामुळे मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न कोणत्याही मंडळाकडून झाला नाही.

दुपारी बारा वाजल्यानंतर मिरवणूक(Procession) मार्गावर मंडळांच्या श्री गणेश मूर्तींची रांग लागली होती. तथापि मिरवणुकीत दोन मंडळांच्या मध्ये भरपूर अंतर असल्यामुळे मिरवणूक विस्कळीत स्वरूपात दिसत होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने रंकाळा तलावाचा एक भाग असलेल्या इराणी खाणीमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तिथे गणेश मूर्ती खणी च्या मध्यापर्यंत नेऊन विसर्जित करण्यासाठी तराफ
उपलब्ध करून दिले जात होते.

सोमवारी रात्री काही गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारच्या मिरवणुकीसाठी मिरवणूक मार्गावर आधीच काही ट्रॅक्टर आणून उभा केले होते. पोलिसांनी हे ट्रॅक्टर हटवून रस्ता रिकामा केला. रंकाळा तलाव परिसरातील इराणी खण येथे श्री गणेशाचे विसर्जन सुविहितपणे होण्यासाठी महापालिका प्रशासनाने जयत तयारी केली होती. अग्निशमन यंत्रणेसह आपत्कालीन व्यवस्था आपण समितीचे अधिकारीही तिथे उपस्थित होते. व्हाईट आर्मीचे जवान तिथे उपस्थित होते. सकाळी सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली.

दुपारपर्यंत श्री विसर्जन मिरवणुक विस्कळीत होती. खऱ्या अर्थाने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला भव्यता हे सायंकाळ नंतरच प्राप्त होते. अंधार पडल्यानंतरच सळसळणारा उत्साह घेऊन मिरवणूक कुर्मगतीने पुढे जात असते. दिलबहार तालीम मंडळ, उत्तरेश्वर पेठ वाघाची‌ तालीम, अवचित पीर तालीम मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, कलकल ग्रुप तरुण मंडळ, संभाजीनगर गणेशोत्सव मंडळ, आझाद गल्ली म्हसोबा तरुण मंडळ, महाराणा प्रताप चौक तरुण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, शिंगोशी मार्केट तरुण मंडळ, ताराबाई रोड मित्र प्रेम मंडळ, अशी कितीतरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर आली होती.

मिरवणुकीसाठी प्रशासनाने काही पर्यायी मार्ग सुद्धा गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून दिले होते. मिरवणुकीच्या प्रारंभ बिंदूपासून ते इराणी खण येथील शेवटच्या बिंदूपर्यंत तसेच शहरातील प्रमुख चौकामध्ये बंदोबस्तासाठी सुमारे अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. गृहरक्षक दलाच्या जवानांना ही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
एकूणच अभूतपूर्व उत्साहात श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे. कसबा बावडा येथे सुद्धा स्वतंत्रपणे मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा:

इचलकरंजीत ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमांतर्गत पोलिसांना पौष्टिक आहार वाटप

PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव

प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीने आईची हत्या केली