सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकले रौप्य पदक, माणदेशीच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा: पॅरिस पॅरालिम्पिक (paralympics) 2024 मध्ये माणदेशीचा सुपुत्र सचिन सर्जेराव खिलारी यांनी आपल्या अद्वितीय धैर्याने आणि मेहनतीने भारतासाठी रौप्य पदक पटकावले आहे. गोळाफेक F46 प्रकारात सचिनने 16.32 मीटरच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान मिळवून देशवासीयांचे मन जिंकले.

सचिनच्या आयुष्यात आलेले संकट अगदी बालपणातच होते, जेव्हा सायकल चालवताना पडल्यामुळे त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला आणि गँगरीनसारख्या गंभीर आजाराने त्याला घेरले. या संकटातून हात वाचला पण त्याच्या हालचालींवर कायमची मर्यादा आली. मात्र, या मर्यादांचा विचार न करता, सचिनने आपल्या आवडीच्या खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आझम कॅम्पसमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅक पाहिल्यानंतर त्याच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने थाळीफेक आणि भालाफेकच्या सरावास सुरुवात केली.

सचिनने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली छाप सोडली आहे. 2023 आणि 2024 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच 2022 मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

सचिनने केलेल्या कामगिरीमुळे भारताने 40 वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्ये (paralympics) गोळाफेक प्रकारात पदक जिंकले आहे. 1984 नंतर प्रथमच भारताला या प्रकारात पदक मिळाले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सचिनने देशाच्या पदकसंख्येत 21 व्या पदकाची भर घातली आहे. त्याच्या धैर्यपूर्ण संघर्षाची आणि अभूतपूर्व यशाची गाथा देशातील तरुणाईसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरली आहे.

हेही वाचा:

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर तयारी; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडली

“कोकणातील राजकीय वाद: उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात तणाव वाढला”

“सकारात्मक विचारांच्या ताकदीवर जीवनात यश प्राप्त करणे – मनोवैज्ञानिकांचे मार्गदर्शन”