सांगली: प्रतापसिंह उद्यानात पक्ष्यांचे विश्व उलगडणारे पक्षी संग्रहालय लवकरच खुले होणार

सांगली, 12 जुलै 2024: सांगली महानगरपालिकेच्या वतीने प्रतापसिंह उद्यानात भव्य पक्षी संग्रहालय (museum)उभारण्यात येत आहे. या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्यातील काम 60 टक्के पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही निधी मंजूर झाल्याने येत्या काही महिन्यांत हे संग्रहालय पक्षीप्रेमींसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

या पक्षी संग्रहालयात विविध प्रकारचे देशी-विदेशी पक्षी पाहायला मिळणार आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे जीवनचक्र, आहार, निवासस्थान याबाबत माहिती देणारे फलक, छायाचित्रे आणि दृकश्राव्य साधने येथे उपलब्ध असतील. यामुळे पक्ष्यांबद्दल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांना हे संग्रहालय एक नंदनवन ठरणार आहे.

पक्षी संग्रहालयाच्या उभारणीसाठी एकूण 2.16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी 1.16 कोटी रुपये मंजूर झाले होते, तर नुकत्याच झालेल्या सुधारित आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून पक्ष्यांसाठी पिंजरे, जाळी, घरटी, खाद्य-पाणी व्यवस्था, माहिती फलक, उद्यान विकास आदी कामे केली जातील.

विधानसभा निवडणुकीपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील कामांचा कार्यारंभ आदेश निघाल्यास जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन हे पक्षी संग्रहालय सांगलीकरांसाठी खुले होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे

हेही वाचा :

पेपर लीक प्रकरण: व्हायरल स्क्रीनशॉट प्रकरणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

आज होणार बहुचर्चित विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान

हॉटेलचा स्वाद, घरातली हौस! नवरत्न कुर्माची खास रेसिपी आता तुमच्यासाठी