विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र(political news) आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. मात्र या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नये. विरोधकांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. निवडणुकीत पैशाचा आणि यंत्रणेचा जो दुरूपयोग केला जातो, तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जागरूक रहायला हवं. काही दिवसांतच आचारसंहिता लागेल हे लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी आपापल्या उमेदवाराकडे काल रात्रीपर्यंत पैशांचं वाटप केले आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराकडे साधारण 10 ते 15 कोटी रुपये पोहोचले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैशांचे वाटप करण्यात आले हे सगळं वाटप झाल्यानंतरच निवडणुकांची घोषणा होत आहे का? असेही संजय राऊत म्हणाले. याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही फायदा होणार आहे का? पत्र लिहून जरा फायदा झाला असता तर गेल्या काही वर्षात अनेक विषयांवर आम्ही पत्र लिहिली.

खास करून आमच्या मुंबईमध्ये अमोल किर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनीच हा पराभव घडवण्यात सत्याधारांची मदत केली. त्याबाबत आम्ही बरीच पत्र लिहिली. मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांच्या बॅगा कशा पद्धतीने उतरवत होते, त्याचा व्हिडिओ मी निवडणुका आयोगाकडे दिला. तरी त्याच्यावर कारवाई नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या कानाचे पडदे स्वच्छ करून ऐकावे एवढीच आमची अपेक्षा असल्याची टीका संजय त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत(political news) पोस्टल मतदानाबाबत जो गोंधळ झाला होता त्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, गोंधळ हरियाणामध्ये देखील झालेला आहे. कमी फरकाने जिथे विजय होतो तिथे पोस्टल मतांमध्ये घोटाळे करून आपल्याला हवे तसे निकाल घ्यायचे ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे.

हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थानच्या निकालानंतर अनेक प्रमुख पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगाला कळविले आहे, असे त्यांनी म्हटले. सध्या नरेंद्र मोदी हे मोकळेच आहेत. त्यांचं लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशात फिरून झालेले आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेच्या अडचणी आल्या तरी सुद्धा महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक व्हायला हरकत नाही. सत्ताधाऱ्यांना जिथे जिथे पैसे पोहोचवायचे होते, तिथे पैसे पोहोचलेले आहेत, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी आज होणार आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अत्यंत घटनाबाह्य हे कृत्य आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. राज्यपाल नियुक्त आमदार संदर्भातील निकाल अद्याप प्रलंबित आहे. 7 ऑक्टोबरला दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ‘क्लोज फॉर ऑर्डर’, असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे.

तो निकाल प्रलंबित असताना निवडणुकीच्या घोषणे आधी आधी घाईघाईने विविध जाती-धर्माच्या सदस्यांना तुम्ही घाईघाईने शपथ देत आहात हे घटनाबाह्य आहे. हे घटनाबाह्य काम केंद्र सरकारच्या मदतीने राज्यपालांना हाताशी धरून करण्यात आले आहे. आम्ही तीन वर्षांपूर्वी आमची यादी पाठवली होती. तेव्हा राज्यपालांचा आमच्या यादीवर आक्षेप होता. हा कॅबिनेटने घेतलेला निर्णय होता. राज्यपालांचा प्रत्येक सदस्यावर आक्षेप होता. आमच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या यादीला एक न्याय आणि आता राजकीय स्वार्थासाठी पाठवलेल्या यादीला दुसरा न्याय अशी स्थिती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा:

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

IPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, ‘हा’ महत्त्वपूर्ण नियम केला रद्द

आज वृद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; वृश्चिकसह 5 राशींना होणार डबल लाभ