सांगली लोकसभा निवडणुकीचा मतदान पार पडल्यानंतरही तीन पाटलांच्यात(friend) कोण बाजी मारणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जूनला असला तरी सांगली लोकसभेतील पारंपारिक विरोधक अजूनही एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ मतदानानंतरही सुरू आहे. सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांनी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला, असे विधान केल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
सांगलीत संजयकाका आणि विशाल पाटलांच्या मध्ये दिलदार मित्र आणि दिलदार शत्रू(friend) वरून वाकयुद्ध सुरू झाले आहे. दोघांकडूनही आपणच विजयी होण्याचा दावा केला जात आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे.
कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला असे म्हणत आपल्याला सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांनी मदत केल्याचं एक प्रकारे संजयकाकानी बोलताना मान्य केले होते. यावर बोलताना विशाल पाटील यांनी काही लोकांकडून आम्ही या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही, असे सुचक विधान केले.
आम्ही विरोधकाकडून अपेक्षा ठेवत नाही, कारण माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही. शत्रूकडून अपेक्षा ठेवावी लागत नाही. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते. संजयकाका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की ते आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहेत, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.
खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटील यांचा बळी दिला, असा टोलाही विशाल पाटलांनी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव न घेता लगावला. संजयकाकांनी त्यांच्या दिलदार शत्रूसोबत बसून षड्यंत्र रचले. सांगलीत नुरा कुस्ती लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो फसला. त्यामुळे मावळते खासदार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांचा राग, अहंकार बाहेर येत आहे, अशी जोरदार टीका विशाल पाटील यांनी केली.
सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजयकाका पाटील यांनी, माझे नशीब उलटे सुलटे करण्याची अजून कुणाच्यात हिंमत नाही, माझे नशीब बदलणारा अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही, असे म्हटले होते. लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. आपल्याला जिल्ह्यातील काही नेत्यांनी गुप्तपणे मदत केलीय हे खरे आहे का? असा प्रश्न संजय काकांना विचारला असता कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला, असे विधान त्यांनी केले होते.
हेही वाचा :
भाजपा 255 च्या वर जाणार नाही; अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचा दावा
इचलकरंजी येथील सांगली रोडचे नागरिक आक्रमक.… अन्यथा मोठे जन आंदोलन छेडणार