कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती(Scholarship) योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. यंदा या योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती(Scholarship) योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या समाजघटकांसाठी विशेषतः ही योजना आहे. ही योजना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत २०२१-२२ पासून राबविली जात आहे.
या योजनेचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे, त्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास सहकार्य करणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना लागू असून, अनुदानित विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ९,६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
२०२४-२५ वर्षासाठी नववी ते बारावीच्या ७२,३२३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील दोन जिल्ह्यांचे अर्ज प्रक्रियेत असून, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, अमरावती, वर्धा, नाशिक, चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी अर्जाची छाननी व पडताळणी सुरू असून, लवकरच त्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येईल.
मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) देण्याचा कल वाढत आहे. यामागे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक व शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे. परीक्षेतील यशाचा टक्का वाढत असून, या योजनेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होत आहे.
हेही वाचा :
विधानभवन प्रशासनाचा ४०० कर्मचाऱ्यांना दणका, केली मोठी कारवाई
मोठी बातमी! ‘या’ राज्यातही आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण
महाराष्ट्रानंतर आता देशातही लाडकी बहीण योजना? बजेटआधी पंतप्रधान मोदींनी दिले संकेत