इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई
दररोज १८ एमएलडी पाण्याची तूट मजरेवाडी उपसा केंद्रातील एक पंप नादुरुस्त
इचलकरंजी, ता. ११ पावसाळा सुरू झाला असतानाही शहरात(water) पाण्यासाठी नागरिकांना दाहिदिशा करण्याची वेळ आली आहे. सध्या शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मजरेवाडी उपसा केंद्रातील सध्या एकच उपसा पंप सुरू आहे. दुसरा उपसा पंप गाळ अडकल्यामुळे बंद पडला आहे. यामुळे दररोज तब्बल १८ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा सध्या पूर्णतः विस्कळीत झाला आहे.
कृष्णा नदीतून शहराला प्रमुख पाणीपुरवठा केला जातो. त्याचे उपसा केंद्र मजरेवाडी ता. शिरोळ येथे आहे. येथे ५४० अश्वशक्तीचे दोन उपसा पंप आहेत. त्यातून दररोज ४५ एमएलडी पाणी उपसा केला जातो. पंचगंगा योजनेतून ३०० अश्वशक्तीच्या एका उपसा पंपामुळे ९ एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे शहरात किमान दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. पण आठ दिवसांपूर्वी मजरेवाडी उपसा केंद्रातील ५४० अश्वशक्तीचा एक उपसा पंप गाळ अडकल्यामुळे बंद पडला आहे. गाळ काढून या उपसा पंपाची दुरुस्ती आठ दिवसांपासून सुरू आहे.
केवळ एकच उपसा पंप सुरू आहे. त्यामुळे(water) दररोज १८ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यातच सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणी उपसा करताना विस्कळीतपणा येत आहे. त्यामुळे शहरात सध्या आठवड्यातून एकदा पाणी येत आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांना शुद्ध पेयजल प्रकल्पांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या मजरेवाडी उपसा केंद्रातील उपसा पंप दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे
गळतीचे संकट कायम
कृष्णा योजनेच्या गळतीचे संकट अद्याप संपलेले(water) नाही. शिरढोणजवळ हेरवाडे यांच्या शेताजवळ जलवाहिनीला आज गळती लागली आहे. गळतीचे काम तातडीने हाती घेतल्यास शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर गळती काढण्यात येणार आहे. पण संबंधित शेतकऱ्यांची भाताची पेरणी मात्र यामुळे खोळंबली आहे.
हेही वाचा :
११ कोटीच्या कामात मोठा गैरप्रकार; खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप
जिल्हाधिकाऱ्यांची तालुकानिहाय विशेष मोहिम!
उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकचा वृद्धाला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
Icc T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पहिली टीम फिक्स