काँग्रेसला शिंदे गटाची साथ, भाजपविरोधात ओपन प्रचार

नंदुरबार : राज्यात लोकसभेसाठी भाजपा, शिवसेनेमधील शिंदे गट(support) आणि राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र राज्यभर निवडणुका लढवल्या. मात्र नंदुरबार लोकसभेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे येऊन मध्यस्थी करूनही शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करीत मतदानावेळी मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चार जून रोजी निकालानंतर नंदुरबार जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटात मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे असे चित्र दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व शिंदे गटाचे(support) नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा संघर्ष गेल्या पंचवीस वर्षापासून आहे. डॉ. विजयकुमार गावित हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री होते. तर चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार म्हणून कार्यरत होते. त्यावेळी राज्यात युती असतानाही दोघांमधील प्रचंड वाद होते.

तेव्हापासून या नेत्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून संघर्ष सुरूच असतो. २००९ मध्ये नंदुरबार विधानसभेसाठी राष्ट्रवादीने डॉ. विजयकुमार गावित यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाच्या उमेदवार सुहासिनी नटावदकर यांना उघड पाठिंबा देत ‘दे धक्का’ म्हणत प्रचार करीत भाजपला मदत केली. मात्र या निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावित हे विजयी झाले.

डॉ. विजयकुमार गावित यांनी २०१४ साली भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या कन्या डॉ. हिना गावित या नंदुरबार लोकसभेत नऊ वेळेचे खासदार असलेले माणिकराव गावित यांचा पराभव करत विजयी झाल्या. २०१९ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. त्याच कालावधीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२०१९ च्या विधानसभेवेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांचा प्रचार केला. मात्र त्यानंतर दोघा नेत्यांमधील संघर्ष वाढतच गेला. कोरोना काळात तर हा संघर्ष टोकाला गेला. शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

नंदुरबार लोकसभेसाठी भाजपाने दोन वेळेसच्या खा. डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र शिंदे गटातील नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी या उमेदवारीला विरोध करून प्रचारापासून ते लांबच राहिले. डॉ. विजयकुमार गावित हे शिंदे गटातील कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी हे भाजपाच्या एका सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित होते. मात्र त्यानंतर ते कुठेही दिसले नाही.

दरम्यान भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना निमंत्रण दिले. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नाहीत, वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच यावर तोडगा काढला जाईल, असे सांगत रघुवंशी यांनी एकत्र येण्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला. त्यानंतर दहा मे रोजी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. या सभेसाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले. व्यासपीठावरही चंद्रकांत रघुवंशी उपस्थित राहिल्याने त्यांचे मत परिवर्तन होईल, असे वाटत असताना तसे काही घडले नाही .

त्यानंतर त्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह चर्चा करण्यात आली. ‘झाले गेले ते विसरून जा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा आदेश दिला. मात्र मुख्यमंत्री परतताच शिंदे गटाने काँग्रेसचा जोमाने प्रचार केला. इतकेच काय तर नंदुरबार तालुक्यात काँग्रेसची चांगली स्थिती नसताना नंदुरबारसह जिल्ह्यात मतदानावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजप विरुद्ध बुथ स्थापन करून काँग्रेसचा प्रचार केला.

नंदुरबार जिल्ह्यात भाजपा विरुद्ध इतर पक्ष असा संघर्ष सुरू आहे. त्यातच शिंदे गटाची भर पडली आहे. मतमोजणीनंतर भाजपा व शिंदे गटात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. असे असले तरी जिल्ह्यात एवढ्या घडामोडी घडत असताना वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा जिल्हा वासियांमध्ये रंगली आहे.

हेही वाचा :

आमदार पी. एन. पाटील एक सरळमार्गी राजकारणी

मुलाला गुपचूप बेडरुममध्ये घेऊन गेली जान्हवी; वडिलांनी सीसीटीव्ही पाहताच…

आमदार पी. एन. पाटील एक सरळमार्गी राजकारणी