शिंदेंच्या बेपत्ता पदाधिकाऱ्याची कार दगडाच्या खाणीत सापडली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (political)यांच्या शिवसेनेचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाडमध्ये सापडली आहे. दगडाच्या खाणीत त्यांची कार आढळून आली. पाण्यानं भरलेल्या खाणीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी हायड्रासह आवश्यक यंत्रणा मागवण्यात आलेली आहे. पालघर पोलिसांसह गुजरात पोलीस खाणीजवळ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.

डहाणू विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे(political) संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास पालघरमधील घोलवड पोलिसांकडून सुरु आहे. धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता त्यांची ब्रीझा कार गुजरातच्या भिलाडमध्ये एका खाणीत सापडली आहे. पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सध्याच्या घडीला पालघर पोलीस दलाचे कर्मचारी आणि अधिकारी खाण परिसरात दाखल झाले आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलदेखील तिथे उपस्थित आहेत. गुजरात पोलीस दलातील अधिकारीदेखील खाणीजवळ आहेत. धोडी यांच्या कारमध्ये काही पुरावा सापडतो का, याची प्रतीक्षा पोलिसांना आहे.

खाणीजवळील एका दगडावर कारचा सेन्सर सापडला आहे. दगडाची खाण ५० फूट खोल असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ती बाहेर काढण्यासाठी काही तास लागू शकतात. धोडी बेपत्ता होऊन १२ दिवस उलटले आहेत. त्यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर ५ आरोपींचा शोध सुरु आहे. त्यातील २ आरोपी राजस्थानच्या दिशेनं पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच तपास नीट केला नसल्याचा आक्षेप धोडी यांच्या कुटुंबियांनी आधीच नोंदवला आहे.

हेही वाचा :

Apple Watch चाहत्यांसाठी मोठी संधी; इथे मिळतोय सर्वात बंपर डिस्काउंट

प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; रेस्क्यू ऑपरेशन सुरू Video Viral

वयाच्या साठाव्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडला आमिर खान?