शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. साई संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांवर (employees) पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला, ज्यात दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला आहे. कामावर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
धक्कादायक बाब म्हणजे, शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जात असताना चाकू हल्ला झाला असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भाजपचे स्थानिक नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या(employees) कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या या घटना घडल्या आहेत. पहाटे चारच्या सुमारास या घटना घडल्याने फार लोक जागे नव्हते. दोन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले, तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. शिर्डीसारख्या तीर्थक्षेत्री एकाच दिवशी पहाटेच्या वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे शिर्डीत प्रचंड संतापाचे वातावरण असून, स्थानिकांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या हल्ल्यात सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही शिर्डी साई संस्थानात नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ हे साकुरी शिवचे रहिवासी आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव कृष्णा देहरकर असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला होता.
या हत्याकांडाला अपघात म्हणण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कारवाईत तत्परता दाखवली नाही, असा आरोपही स्थानिकांकडून होत आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. अशा गजबजलेल्या भागात अशा प्रकारे हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नशेखोराने हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे या घटनेतून दिसून येते. या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा :
उदित नारायणनंतर गुरु रंधावाचा व्हिडीओ व्हायरल, सेल्फी काढताना तरुणीने केलं KISS
क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी ‘ही’ टीव्ही रिपोर्टर झाली मुस्लिम, प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत!
मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाने जीवन संपवलं…