स्वबळाचे नारे की नुसतेच वारे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवडणूक(election) लोकसभेची असो किंवा विधानसभेची! पक्षात आपला सन्मान राखला जात नाही असा एकाकी विचार मनात आणणाऱ्यांकडून पहिल्यांदा नाराजी व्यक्त केली जाते, नंतर इशारे दिले जातात आणि मग दुसऱ्या पक्षाकडे धाव घेतली जाते. अशी पळापळ बहुतांशी प्रमुख राजकीय पक्षात नेहमीच होत असते. आता तर काही राजकीय पक्षांचे संस्थापक स्वबळाचा नारा देऊ लागले आहेत. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाजवादी पक्ष अर्थात रासप हा सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यांनी महायुती मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन स्वबळाचा नारा दिला आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते भाजपच्या, महायुतीच्या जवळपास वावरताना दिसतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत(election) त्यांनी महायुती जवळ केली होती. नंतर त्यांनी बिन शब्द पाठिंबाही दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची प्रचार सभाही झाली होती. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे तेव्हा पाच मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एक मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मान्य ही झाली आहे. नंतर राज ठाकरे यांनी माझा फक्त मोदी यांना तात्कालीक पाठिंबा होता असे जाहीर करून सर्वांना चकित करून सोडले होते. आता त्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे 288 लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित आघाडीने गेल्या पाच वर्षात थोडीफार राजकीय हवा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय मैत्री करून महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांना कुणाचा विरोधी नव्हता पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी बरोबरीने जागा मागितल्या होत्या आणि त्या त्यांना मिळाल्या नाहीत म्हणून मग त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीचा त्यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत.

कोल्हापूरच्या संभाजी राजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य संघटना स्थापन केली आणि आता या संघटनेला निवडणूक (election) आयोगाची पक्ष म्हणून मान्यता ही मिळालेली आहे. त्यांनी परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे आणि त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना सोबत घेतले आहे. या आघाडीकडूनही सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

रा. स. प. चे सर्वेसर्वा महादेव जानकर हे महायुतीचे घटक होते. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी”अरे महादेव! तुझी मी लोकसभेत वाट बघतो आहे”. अशी भावनिक साद घातली होती. ही निवडणूक ते हरले. लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या आधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेऊन संभ्रमित वातावरण तयार केले होते. आता त्यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्ष नेत्यांकडून फारसा सन्मान दिला जात नाही.

विधानसभेत त्यांचा विचार केला जात नाही अशी मानसिकता तयार झालेल्या महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मनात अजूनही द्वंद्व आहे. विधानसभेसाठी लढायचे की, पाडायचे? याचा निर्णय आता ते दिनांक 20 ऑक्टोबर रोजी च्या मराठा समाजाच्या बैठकीत अंतरवाली सराटी येथे घेणार आहेत. त्याआधी त्यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढवू असा इशारा दिला होता. आता त्यांच्या या भूमिकेत थोडासा बदल झालेला दिसतो. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा मराठा फॅक्टर काही मतदारसंघात प्रभावी ठरला होता. आता त्यांना या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उपद्रव मूल्य किती आहे हे दाखवून द्यावयाचे आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा(election) बिगुल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वाजवला गेला. म्हणजे आता सर्वच राजकीय पक्षांच्या हातामध्ये 35 दिवस आहेत. इतका कमी कालावधी असताना, आणि नामांकन पत्रे भरण्याचा दिवस तोंडावर आलेला असताना अनेकांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी त्यांच्याकडून रिंगणात उतरण्याची पूर्वतयारी झालेली आहे असे दिसत नाही.

राज ठाकरे यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे असे घडलेले नाही, पण तरीही मनसे कडून 288 जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. इतक्या कमी कालावधीत, फारशी पूर्वतयारी नसताना काही राजकीय पक्षांकडून देण्यात आलेले स्वबळाचे नारे टिकणार आहेत की नुसतेच ते वारे आहेत हे त्या दोन चार दिवसात स्पष्ट होईल.

हेही वाचा:

दुकानात मिळणारी कुरकुरीत भाकरवाडी आता घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

ऐन दिवाळीत रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘या’ दिवशी होणार लाँच

प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअरचा संशय, हृदय विदीर्ण झालेल्या तरुणाने दरीत उडी मारली