कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विकास कामांचा मुद्दा दोन्ही बाजूंनी उपस्थित केला जातो. एक जण म्हणतोय की मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास(development) कामे केली आहेत तर प्रतिस्पर्धी म्हणतो विकास काम झालेच नाही. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मतदार संघातील गावे खूप दूर आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींकडून गेल्या पाच वर्षात आपण किती निधी आणला याची आकडेवारी सांगितली जाते.
निवडणूक प्रचारात त्याचे भांडवल केले जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातील तत्कालीन विद्यमान खासदारांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून आणल्याचे सांगितले होते. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान दहा आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात अशीच शेकडो कोटी रुपयांची विकास कामे झाल्याचा दावा केला आहे. पण तरीही विकास(development) कामे शोधावी लागत असतील तर मग हा निधी गेला कुठे? मुरला कुठे, जिरला कुठे? कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या विधानसभा निवडणुकीत शिरोळ मतदार संघातील मावळते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघात विकास कामांसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणला असा दावा जाहीरपणे केला आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही गेल्या पाच वर्षात काही हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणले आहेत आणि खर्च पडले आहेत असे सांगितले आहे. राधानगरी भुदरगड मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांनीही शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात 1हजार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे म्हटले आहे.
शाहूवाडी, करवीर, चंदगड, कोल्हापूर दक्षिण, पेठवडगाव, इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्याकडूनही शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आणि विकासकामे केली असे दावे केले आहेत. शहराचा बराचसा भाग असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गावागावात डिजिटल फलक लावून किती कोटी रुपयांचा खर्च किती विकास(development) कामांच्यावर केला याची यादीच दिली आहे. हेच चित्र बहुतांशी विधानसभा मतदारसंघांमधील काही प्रमुख गावांमध्ये दिसते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दहा विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदारांच्याकडून सरासरी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे असे गृहीत धरले तर ही रक्कम पंधरा हजार कोटी रुपयांवर जाते. अपवादात्मक स्थितीत केंद्र शासनाकडून मिळालेला निधी यामध्ये समाविष्ट केलेला नाही. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी आणलेला निधी लक्षात घेतला तर जिल्ह्यासाठी राज्य आणि केंद्र यांच्याकडून सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर मग या निधीतून विकास कामे प्रचंड प्रमाणावर व्हायला हवीत.
आमदार आणि खासदार तसेच केंद्र शासनाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून दरवर्षी एकूण वीस हजार कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या चार निवडणुकांमध्ये मिळाला असेल तर हा निधी 80 हजार कोटी रुपयांवर जातो. गेल्या वीस वर्षात इतक्या प्रचंड प्रमाणावर निधी मिळाला गेला असेल तर मग हा जिल्हा विकास कामात संपूर्ण राज्यात अव्वल यायला हवा. पण वास्तवात या जिल्ह्याचा विकास(development) खऱ्या अर्थाने झालेला आहे काय? हा प्रश्न मतदारांना विचारला तर त्यांच्याकडून नकारार्थी उत्तर येईल. तर मग या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून, किंवा ज्या त्या वेळच्या लोकप्रतिनिधींकडून केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला? याचा तपशील संबंधितांच्याकडून जाहीर केला जात नाही.
कोल्हापूर शहरात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे विधानसभेचे दोन मतदारसंघ येतात. आज या शहराची अवस्था काय आहे? रस्त्यांची चाळण झाली आहे, केवळ 30 ते 35 टक्के भागात सांडपाणी वाहून जाणारी ड्रेनेज व्यवस्था आहे. कोंडाळा मुक्त शहराच्या हव्यासापोटी घरोघरी जाऊन कचरा उठाव केला जातो पण ही यंत्रणा सक्षम नसल्यामुळे कोल्हापूर शहरातील कोणत्याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसेल. शहरातील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक रंकाळा तलावाचे प्रदूषणाचे दुखणे आजही तसेच आहे.
पंचगंगा नदी बद्दल तर बोलायलाच नको इतकी ती कमालीच्या पातळीवर प्रदूषित झाली आहे. असा एकही रस्ता नाही की तिथे पार्किंग व्यवस्था चांगली आहे. पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडल्यामुळे ट्रॅफिक जॅम ही नेहमीची समस्या आहे. फुटपाथ नावाचा प्रकार असून नसल्यासारखा. अतिक्रमणांच्या गर्दीत शहर सापडले आहे. त्याचा श्वास कोंडला आहे. अशा कितीतरी समस्यांनी हे शहर ग्रस्त आहे.
नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तुलनेत कोल्हापूर शहराचा विकास झाला आहे काय?
कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघा व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतरही विधानसभा मतदारसंघात थोड्याफार फरकाने हीच बकाल स्थिती आणि अवस्था आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेला शेकडो कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे गेला? या प्रश्नाचे उत्तर आज सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कडून विद्यमान लोकप्रतिनिधींना विचारला जातो आहे.
हेही वाचा :
भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग… डर्बनमधला Video Viral
गरोदरपणात ‘ही’ अभिनेत्री खातेय गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप, सांगितले फायदेही
‘महायुती सत्तेत आल्यास इचलकरंजीत टेक्सटाईल पार्क उभारणार’; अमित शहांची मोठी घोषणा