मनोज जरांगे पाटील यांचं सोशल इंजिनियरिंग

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशाच्या राजकारणात(political news) अनेक प्रस्थापित राजकीय पक्षांनी निवडणूक काळात सोशल इंजिनियरिंग चा प्रयोग केला आहे. उच्चवर्णीयांना कायम शत्रू स्थानी पाहणाऱ्या मायावती यांनी, उत्तर प्रदेश मध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करताना उच्च वर्णीय समाजासाठी विधानसभेच्या काही टक्के जागा सोडल्या होत्या. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊन त्यांनी राज्यात सत्ता काबीज केली होती. आता प्रस्थापित राजकीय पक्ष हातात नसताना संघटनेला राजकीय दृष्ट्या बळकट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल इंजिनिअरिंग सुरू केले आहे.

राज्यातील 15 जातींना त्यांची मागणी नसतानाही ओवेसी प्रवर्गात त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचा राग मनात धरून मनोज जरांगे पाटील हे भलतेच आक्रमक झालेले दिसतात. आम्हाला संपवायला निघालेल्यांना असा आम्हीच संपवणार आहोत असा निर्धार करून मनोज जरांगे पाटील या विधानसभा निवडणुकीत स्वतःची ताकद अजमावून पाहणार आहेत. त्यासाठी ते सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत.

‌ जेथे मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा जागांवर उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्याआधी त्यांनी 288 जागा लढवू असे सांगितले होते. जिंकण्यापेक्षा प्रस्थापितांना पाडायचं अशीच त्यांची भूमिका आहे. आढापाटीच्या राजकारणात पाडणारा हा जिंकण्याच्या भूमिकेत नसतो हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेले आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत(political news) महायुतीला आणि महा विकास आघाडीला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. या दोन्ही आघाड्या म्हणजे मावस भाऊ आहेत आणि मी त्यांच्यामध्ये सापडलेला सावत्र भाऊ आहे असे त्यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. खऱ्या अर्थाने त्यांना सत्ताधारी महायुती आघाडीला मराठा समाज काय आहे हे दाखवून द्यायचे आहे.

फक्त मराठा समाजाच्या मतदारांच्यावर आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे माहीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजालाही सोबत घ्यायचे ठरवलेले दिसते. त्यानी छत्रपती संभाजीनगर मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे दोन तास निवडणुकी या विषयावर चर्चा केली.

अर्थात या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मराठा समाजाला साथ द्यावी असे मनोज जरांगे पाटील यांना वाटते. त्यासाठीच त्यांनी मुस्लिम मतदारांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील दलित समाजानेही मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहावे असे त्यांना वाटते. मराठा, मुस्लिम आणि दलित हे तीन घटक एकत्र आले तर प्रस्थापितांना त्याचा दणका बसू शकतो. आणि म्हणूनच या निवडणुकीत त्यांच्याकडून सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करण्याचा प्रयत्न दिसतो.

विधानसभा निवडणुकीत आम्ही अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार देऊन राजकारणात प्रवेश करत आहोत असे जाहीर केल्यानंतर अनेक प्रस्थापित उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आणि म्हणूनच प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांच्या कडून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली जाऊ लागली आहे. अनेक मातब्बर राजकारणी आता मनोज पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी या गावात चकरा मारू लागले आहेत.

मराठा समाजाचे उपद्रव मूल्य आमच्या उमेदवारीला(political news) लागता कामा नये यासाठी काही मातब्बर उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी जरांगे फॅक्टरचा चांगलाच धसका घेतलेला दिसतो आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरने महायुतीला दणका दिला असल्याचे समजले जाते. पण त्यांच्यामुळे आमचा विजय सोपा झाला असे एकाही खासदाराने निवडून आल्यानंतर सांगितलेले नाही. किंवा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे असे घडलेले नाही.

मराठा समाजात प्रस्थापित मराठे आहेत आणि विस्थापित मराठेही आहेत. सद्यस्थितीत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे विस्थापित मराठे आहेत. प्रस्थापित मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांचे सोशल इंजिनिअरिंग फारसे आवडलेले नाही. फक्त ते बोलून दाखवत नाहीत इतकेच.

मराठा आरक्षणाचा प्रश्न हातात घेऊन गेल्या 14 महिन्यापासून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिंकण्यापेक्षा पाडापाडीच्या राजकारणात त्यांना अधिक इंटरेस्ट आहे. त्यांची ही भूमिका कायम टिकली तर त्याचा नेमका परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतो हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा:

वाढदिवसाच्या 2 तास आधी क्रिकेटपटूला मिळालं खास गिफ्ट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास