कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : या महाराष्ट्राला शाहू फुले आणि आंबेडकर यांनी सामाजिक(justice) न्याय दिला. काँग्रेसची इंडिया आघाडी सत्तेवर आली तर त्यांच्याकडून सामाजिक न्यायाची हत्या केली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे बोलताना दिला. कळंबा रोड वरील तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. या सभेत ते बोलत होते. करवीरवासियांना, कोल्हापूरच्या जनतेला घरोघरी जाऊन माझा नमस्कार सांगा असे आवाहनही त्यांनी यावेळी जमलेल्या गर्दीला केले.
2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर(justice) शनिवारी सायंकाळी झालेली ही दुसरी प्रचार सभा होती. गेल्या दोन दिवसापासून महायुतीच्या स्थानिक नेत्यांकडून या जाहीर प्रचार सभेची जय्यत तयारी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 25 मिनिटे भाषण केले. करवीर निवासिनी अंबाबाईला माझे त्रिवार वंदन अशी त्यांनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, रणरागिणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांचा त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आदरपूर्वक उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि काँग्रेसची इंडिया आघाडी यावर त्यांनी आपल्या भाषणात हल्लाबोल केला.
कोल्हापुरात प्रामुख्याने फुटबॉल खेळ खेळला जातो. इथे फुटबॉलच्या स्पर्धा होतात. याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही म्हणजे एन डी ए आघाडीने यापूर्वीच दोन गोल केलेले आहेत तर काँग्रेसने दोन सेल्फ गोल केलेले आहेत. आता तिसऱ्या टप्प्याची जबाबदारी जनतेवर आहे.
आम्ही काश्मीर मधील 370 कलम हटवले आहे, ते काँग्रेसला पुन्हा आणावयाचे आहे, आम्ही सी ए ए हा भारतीय नागरिकत्व कायदा केला, तो काँग्रेसला पुन्हा बदलावयाचा आहे, रद्द करावयाचा आहे, तुम्हाला वारसा कातून मिळणाऱ्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, सर्व सामान्य जनतेकडून कर रूपाने मिळणारा पैसा काँग्रेसला इथल्या मुस्लिम समाजावर उधळावयाचा आहे.
काँग्रेसचा हा अजेंडा शिवभूमी असलेल्या महाराष्ट्रातील जनतेकडून स्वीकारला जाणार नाही.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटनास आमंत्रण देऊनही काँग्रेसची मंडळी उपस्थित राहिली नाहीत. काँग्रेसचे तीन अंकी खासदार निवडून येत नाहीत. पण त्यांना केंद्रात सत्ता येण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांची कर्नाटकात सत्ता आहे पण तेथेमुख्यमंत्री पदाच्या मुदतीचे तुकडे पाडले जात आहेत. केंद्रातही दरवर्षी एक त्याप्रमाणे पाच पंतप्रधान देण्याची त्यांची मानसिकता आहे. पण या देशातील सर्व सामान्य जनता इंडिया आघाडीला थारा देणार नाही. महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. या सामाजिक न्यायाची हत्या करण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या इंडिया आघाडीकडून केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्नाटक मॉडेलचा उल्लेख केला. कर्नाटक मधील काँग्रेसचे सरकार हे ओबीसींचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम समाजाला देत आहे. कर्नाटकात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण तेथे मुस्लिमांना दिले जाणार आहे. हे कर्नाटक मॉडेल त्यांना ते सत्तेवर आले तर देशात राबवायचे आहे. धर्माच्या नावावर त्यांच्याकडून आरक्षण दिले जाणार आहे. त्यांनाच संविधान बदलून आरक्षण धोरण अशा प्रकारचे राबवायचे आहे. काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अपमानच केला गेला.
महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी या कोल्हापूर साठी काय केले? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. आम्ही सत्तेवर आलो आणि आम्ही कोल्हापूर वैभववाडी कोकण रेल्वे चा मुहूर्त केला. या कोकण रेल्वेला मंजुरी दिली. कोल्हापूर ही करवीर निवासिनी अंबाबाई ची भूमी आहे. इथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी आम्हीच निर्णय घेतले. जगात भारी कोल्हापुरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरला आम्ही आणखी प्रगतीपथावर नेणार आहोत. म्हणूनच आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता देण्याची जबाबदारी आता तुमची आहे.
महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मला मत दिल्यासारखे आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. याकूब मेमन, औरंगजेब यांचे उदातीकरण ज्यांच्याकडून केले जाते आहे त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आघाडी केली आहे. सरकार बनाओ, नोट कमावो अशी विचारधारा असलेल्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेल्यामुळे आता ती नकली शिवसेना झालेली आहे. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोंड सुख घेतले.
तपोवन मैदानावर झालेल्या या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टांगा पलटी, घोड फरार असा कोल्हापूर बद्दलचा उल्लेख केला. कोल्हापुरात पंचगंगा नदीला महापूर आला की इथले ग्रामस्थ आपलं पशुधनही घराच्या टेरेसवर नेऊन ठेवतात. पशुधनाची काळजी घेतात. मात्र मुंबईत 26 जुलै रोजी जो महापूर आला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना एकटं सोडून हेच उद्धव ठाकरे फॅमिली सह पंचतारांकित हॉटेलमध्ये राहावयास गेले होते. अशी जोरदार टीका केली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या छोट्याशा भाषणात काँग्रेस आणि शिवसेनेवर घनाघाती टीका केली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा देण्यात आली तसेच कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ भेट म्हणून देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने उजळाईवाडी येथील विमानतळ ते कळंबा येथील तपोवन मैदान या मार्गावर प्रचंड प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्ली, मुंबई आणि स्थानिक अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासाठी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सभास्थळी जाणारा ताफा पाहण्यासाठी मार्गावर दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :
डाळी कडाडल्या, अवकाळीमुळे उत्पादनात घट
उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दोन धक्के
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच, बंद खोलीत चर्चा