कोल्हापूरच्या राजकारणातली मेहुण्या/ पाहुण्याची गोष्ट….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा(political articles) निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. मुंबईत महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाच्या वाटाघाटीच, चर्चेचा सत्र सुरू आहे. वंचित आघाडीने अकरा उमेदवारांची घोषणा केली आहे. कोणती जागा कोणाकडे हे निश्चित झाल्यावर जिल्हा अंतर्गत राजकारणाला वेग येणार आहे. आपली उमेदवारी निश्चित असल्याचे समजून काही जणांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. राधानगरी भुदरगड विधानसभा(political articles) मतदारसंघातून प्रकाश अबिटकर हे विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार निश्चित असून महाविकास आघाडी कडून इथे कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तरीही माजी आमदार के. पी. पाटील आणि एल. वाय. पाटील या मेहुण्या पाहुण्यांनी महाविकास आघाडीचे आपणच उमेदवार असणार आहोत असे जाहीर कार्यक्रम घेऊन सांगितले आहे.

के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडूनही गेलेले होते. त्यांनी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही स्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत असे जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष अजून निश्चित झालेला नाही. मध्यंतरी ते उद्धव ठाकरे यांच्याही संपर्कात होते. आणि नंतर मी शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडलेली नाही असेही जाहीर केले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही पर्याय त्यांनी ठेवले आहेत.

विशेष म्हणजे बिद्री साखर कारखान्याच्या राजकारणात(political articles) ते महायुतीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत आहेत. नुकताच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन माझी लढत गद्दारांच्या विरुद्ध आहे म्हणजे अबिटकर यांच्या विरुद्ध आहे. असे जाहीर करून महाविकास आघाडीचे आपणच उमेदवार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपले मेहुणे एल वाय पाटील यांचा साधा उल्लेखही केला नाही.

आत्ता नाही तर मग कधीच नाही असा विचार करणाऱ्या एल वाय पाटील यांनी महाविकास आघाडी कडून आपली उमेदवारी निश्चित आहे, एक-दोन दिवसात ती जाहीरही होईल असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केला आहे. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी जिल्हाध्यक्ष पद भूषवले होते. पण त्यांना आमदारकीच्या मांडवा खालून जायचे आहे.

त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा विचारही त्यांनी केला होता पण तेव्हा अजितदादा पवार यांनी त्यांना वेगळा विचार करू नका असे आवाहन करून एसटी महामंडळावर त्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर अजितदादा गटच राष्ट्रवादीतून फुटला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर एल वाय पाटील यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी हवी आहे आणि ती आपणाला मिळालेलीच आहे असे ते सांगतही सुटले आहेत.

राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून के. पी. पाटील यांनी आपणाला संधी द्यावी. अशी वारंवार भूमिका घेतल्यानंतर आणि त्याला स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर केपी यांच्याशी त्यांचे बिनसले आहे. हे दोघेही मेहुणे पाहुणे आहेत पण राजकारणामुळे आता त्यांच्यात वितुष्ट आले आहे.

सध्या तरी के पी पाटील यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. त्यांच्याकडे साखर कारखान्याची सत्ता आहे. ते दोन वेळा आमदार बनलेले आहेत. त्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता आहे असा विचार महाविकास आघाडी कडून केला जातो आहे. तसे झाले तर एल वाय पाटील यांची मोठी अडचण होणार आहे. मग त्यांना केपी यांच्या विरोधात बंडखोरी करावी लागेल किंवा त्यांना पराभूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला बळ द्यावे लागेल.
शिवसेनेच्या दोन वेळा आमदार झालेल्या कोणालाही विजयाची हॅट्रिक करता आलेली नाही. सत्यजित पाटील सरूडकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉक्टर सुजित मिंणचेकर, अशी हॅट्रिक न करता आलेल्या आमदारांची नावे वानगी दाखल देता येतील.

या एकूण पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगड विधानसभा(political articles) मतदारसंघातून सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या प्रकाश अबिटकर यांना यंदा विजयाची हॅट्रिक करता येईल का? या निवडणुकीत मेहुणे पाहुणे रिंगणात आले तर त्यांच्यातील दुहीचा अबिटकर यांना फायदा होऊ शकतो. के पी पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अबिटकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव केला होता.

त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत के पी पाटील यांना करावयाची आहे. केपी आणि एल वाय हे दोघेही महाविकास आघाडीचे उमेदवारी आम्हालाच मिळणार आहे असे सांगत आहेत. उमेदवारी नेमके कोणाला मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

हेही वाचा:

हुपरीतील चांदी उद्योजकाचा खून…

भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत

नणंद-भावजय एकत्र बाहेर पडल्या, पण भावजय घरी परतलीच नाही; नंतर झुडपात…