साखर महागणार? 11 रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारचे संकेत

देशात नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गोड पदार्थ महागणार असल्याचं दिसतंय. कारण साखर(Sugar) महागणार असल्याची माहिती मिळतेय. अकरा रूपयांनी साखरेचे प्रतिकिलो भाव वाढू शकतात. शेतकरी आणि साखर संघटनांकडून साखरेची एमएसपी वाढवावी अशी मागणी गेली कित्येक दिवसांपासून केली जातेय. सरकारने एमएसपी वाढवल्यास किरकोळ बाजारातही साखरेचे दर नक्कीच वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे.

साखरेची(Sugar) किमान विक्री किंमत वाढवण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. सध्या साखरेचा एमएसपी 31 रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. हा दर फेब्रुवारी 2019 मध्ये सेट करण्यात आला होता. त्यानंतर साखरेच्या एमएसपीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, वाढता उत्पादन खर्च आणि साखर कारखानदारांसमोरील आर्थिक दबावामुळे उद्योग संघटना सातत्याने दर वाढवण्याची मागणी करत आहेत.

केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले की, एमएसपी वाढवण्याची मागणी आहे. विभागाला या प्रकरणाची माहिती आहे. ती वाढवायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेऊ. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशन किमान विक्री किंमत 39.14 रुपये प्रति किलो किंवा अगदी 42 रुपये प्रति किलोपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एमएसपी वाढल्यास भारतातील साखर कारखान्यांच्या आर्थिक आरोग्यास समर्थन देण्यासाठी उपयुक्त ठरेल. साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यास कारखान्यांना आर्थिक मदत मिळेल आणि शेतकऱ्यांची उसाची थकबाकीही लवकरच मिळेल. निधीअभावी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये अनेकदा साखर कारखानदारांकडे थकीत राहतात.

साखरेचा एमएसपी वाढवला म्हणजे ठरलेल्या किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करता येणार नाही. जेव्हा साखरेची आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी सुमारे 11 रुपयांनी वाढेल, तेव्हा निश्चितपणे किरकोळ बाजारातही साखरेची किंमत वाढेल. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. साखर महाग झाल्याने मिठाईसह बहुतांश खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

हेही वाचा :

मोठी बातमी; ‘या’ महिलांना आता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ

स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापुंना ‘सु्प्रीम’ दिलासा; 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर

“रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत रिटर्न्स! टोरेस कंपनीने मुंबईतील गुंतवणूकदारांना कसा लावला चुना?