सुरेश धस, तुम्ही सुद्धा एकाच माळेतले मणी निघालात….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजीनामा घेतल्याशिवाय, “आका च्या आका वर” कारवाई झाल्याशिवाय मी थांबणार नाही, स्वस्थ बसणार नाही अशी सर्वसामान्य जनतेला भावणारी भूमिका घेऊन आंदोलनाच्या रणांगणात उतरलेल्या आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे(politics) यांच्यावर उगारलेली शस्त्रे अचानक खाली ठेवली आहेत. माझी लढाई सुरूच राहणार आहे असे त्यांच्याकडून सांगितले जात असले तरी आता महाराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी निमित्त झाल आहे ते सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दोन वेळा झालेल्या भेटीचे. बदमाष लोकांचा शेवटचा अड्डा म्हणजे राजकारण हे आता या निमित्ताने महाराष्ट्रात तरी अधोरेखित झाला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांची सावली म्हणून परळी बीड परिसरात वावरणाऱ्या वाल्मीक कराड याचे नाव एका एका खंडणीच्या गुन्ह्यात घेतले जाऊ लागले. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात तो मास्टर माईंड असल्याचे बोलले जाऊ लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी ही दोन्ही प्रकरणे लावून धरली होती.

वाल्मीक कराड हा छोटा आका आहे, आणि त्याला साथ देणारा मोठा आका आहे, आणि या मोठ्या आका ने मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे ते म्हणत असत. इतकेच नव्हे तर धस यांनी एक आंदोलनच उभा केले होते. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा होता. खलनायकाचे निर्दालन करणाऱ्या नायकाच्या रूपात सर्वसामान्य जनता त्यांना पाहत होती. पण अचानक त्यांची आणि धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राला धक्का बसला.

भारतीय जनता पक्षाचे(politics)प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे जवळपास साडेचार तास एकत्र होते. आणि त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोराही दिल्यानंतर ही भेट इतकी गोपनीय का ठेवली होती असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. त्यानंतरही सुरेश धस हे धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नाही म्हणून त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेले होते हे सुद्धा कळाल्यानंतर या भेटीचे समर्थन करताना सुरेश धस यांची चांगलीच दमछाक झालेली दिसली.

धनंजय मुंडे हे सुरुवातीला भारतीय जनता पक्षात होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात त्यांच्याविषयी एक हळवा कोपरा असावा, आणि त्यातूनच महायुतीच्या सरकारची बदनामी होत असतानाही हे दोघेजण धनंजय मुंडे यांच्या बद्दलचा निर्णय अजितदादा पवार घेतील आणि तो निर्णय आम्हालाही मान्य असेल असे म्हणत होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशा अध्यक्षांच्या घरात साडेचार तास चर्चा झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेत मोठा बदल झालेला आहे असे म्हणता येईल. आता तर या दोघांमध्ये मनभेद नाहीत तर मतभेद आहेत. हे मतभेदही फार मोठे नाहीत, असे सांगितले जाऊ लागले आहे.

होय, मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात जाऊन भेटलो, त्यात एवढा गहजब करण्याचे कारण काय असा उलटा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे. पण सर्वसामान्य जनतेचा”दोन महिने ज्याला तुम्ही झोडपून काढले, त्याच्याबद्दल आत्ताच इतके ममत्व का?”हा त्यांना सवाल आहे.

अजित दादा पवार(politics) यांनी धनंजय मुंडे यांना दिलेली क्लीन चिट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटी मध्ये त्यांना घेतले जाणे आणि सुरेश धस यांच्या धनंजय मुंडे विषयक भूमिकेत अचानक मोठा बदल होणे हा नक्कीच योगायोग नाही. आता वाल्मीक कराड हे नाव मी पहिल्यांदा ऐकले आहे, त्याला मी ओळखतही नाही असे खुद्द धनंजय मुंडे यांनी सांगितले तर महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला(politics) कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आणि मुंडे यांच्याकडून त्यांचा जिगरी दोस्त वाल्मीक कराड याला शिक्षेची झळ बसू नये म्हणून प्रयत्न केलेच जाणार नाहीत असे नाही. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराड आणि तुरुंगाबाहेर असलेली त्याची बी टीम हे विषय आता सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लावून धरले जाण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने पाहत होता ते आमदार सुरेश धस हे एकाच माळेतले मणी निघाले आहेत असे म्हणता येईल.

परभणी मध्ये झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती आणि त्याचे न्यायालयीन कोठडीच असतानाच निधन झाले होते. आणि त्याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेला होता हे स्पष्ट झाल्यानंतर दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत असताना”या पोलिसांना माफ करावे”असे आश्चर्यकारक मागणी खुद्द सुरेश धस यांनी केल्यामुळे त्यांच्या या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा :

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? 

धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, सुनबाईला दिलं एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन

क्रिती सेनन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नापूर्वीच सासू-सासऱ्यांना गेली भेटायला, Video व्हायरल