महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. भाजपने नुकतीच 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशात कॉँग्रेसनेही (Congress) बंडखोरांवर कारवाई केली आहे.
ज्या कॉँग्रेसच्या(Congress) उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय.
यासोबतच जयश्री पाटील यांना देखील निलंबित करण्यात आलंय. सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष म्हणून आता पृथ्वीराज पाटील यांना आव्हान दिलं आहे. तर, जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील यांनीही समर्थन दिलं आहे.
कॉँग्रेसकडून अशा बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने काल खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये पाच गॅरंटी जाहीर केल्या आहेत. राहुल गांधी काल महाराष्ट्रात होते. त्यांची काल भव्य सभा झाली. आता 13,16 आणि 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.
दरम्यान, बंडखोर नेत्यांवर कॉँग्रेससह भाजपकडूनही कारवाई करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्यामुळे 40 जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अशात कॉँग्रेसनेही बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
हेही वाचा :.
लहान मुलांना वारंवार ताप का येतो?
कोल्हापूर “उत्तर” मध्ये आता प्रतिष्ठेचा “प्रश्न”
घटस्फोटाच्या अफवांमध्ये अभिषेक ऐश्वर्या नव्या सिनेमात येणार एकत्र?