कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातलं महायुतीचे सरकार(government) हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे ते आज पडणार, उद्या कोसळणार अशी भाकीत गेल्या दोन वर्षात अनेक राजकारण्यांनी अनेक वेळा केली आहेत, पण सरकार काही पडलं नाही. आता तर या सरकारची मुदतही येत्या दोन महिन्यात रीतसर संपुष्टात येणार आहे.
सरकार(government) कोणाचे बनणार? मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत करून टाकले आहे. त्यांच्या या भाकरीतावर महायुतीकडून विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून जोरकस आणि तातडीच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यांचं भाकीत आम्ही गांभीर्याने कधी घेत नाही असंच सूचित करण्यात आले आहे अस सकृत दर्शनी दिसतं.
कोणतेही विशेषता राजकीय भाकीत करताना त्यामागे किमान काही तर्कशास्त्र असले पाहिजे. “आत्याबाईला मिश्या असत्या तर!” या वाक्याला काहीतरी अर्थ आहे काय? त्यात कोणते तरी तर्कशास्त्र आहे काय? महाराष्ट्रातलं आणि हरियाणातलं विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत आले नाही तर केंद्रातलं नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळणार असं पृथ्वीराज चव्हाण यांनी केल आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील सत्ता बदलाचा आणि नरेंद्र मोदी यांच्या एन डी ए सरकारचा परस्पराशी काय संबंध आहे? केंद्र शासन वेगळे आणि राज्य शासन वेगळे. दोन्हीही राजव्यवस्था पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. काही राज्यातील शासन आणि केंद्रातील शासन फार तर एकाच राजकीय पक्षाची असू शकतात, किंवा असतातच असे नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाकिता मागील किमान तर्कशास्त्र काय आहे हे स्पष्ट करणे आवश्यक होते.
या दोन राज्यात आता बदल झाला तर एन डी ए सरकारमधील महत्त्वाचे घटक समजले जाणारे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे वेगळा निर्णय घेतील आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल असे त्यांना म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना सुचित करावयाचे आहे. पण दोन राज्यातील सत्ता बदलाचा आणि नायडू व नितीश कुमार यांचा परस्परांशी संबंध काय?
या दोघांनीही आम्ही या दोन राज्यात सत्ता बदल झाला तर एनडीए मधून बाहेर पडणार असे कुठेही म्हटलेले नाही. या दोघांच्या सरकारला भाजपचे भक्कम समर्थन आहे. हे समर्थन ते कशासाठी गमावतील?
सध्या नरेंद्र मोदी यांच्या एन डी ए सरकारचे(government) संख्याबळ 290 इतके आहे. नायडू आणि नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडावयाचे ठरवले तरी एन डी ए कडे 272 हा मॅजिक आकडा उरतोच. याशिवाय अपक्ष खासदार एनडीए कडे वळवण्यात भारतीय जनता पक्षाला यापूर्वीच यश आलेले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे शासन कोसळेल या भाकीत आला काही अर्थ उरत नाही.
लोकसभा निवडणुका सुरू होत्या तेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, विजय वडेट्टीवार हे आपल्या प्रचार सभा मधून म्हणत होते की सध्या नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान आहेत, दिनांक सहा जून 2024 नंतर ते पंतप्रधान पदावर असणार नाहीत असे भाकीत करत होते. एन डी ए सत्तेच्या वर्तुळात पोहोचल्यानंतर चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे एन डी ए सोडून इंडिया आघाडीमध्ये येणार आहेत असे सांगायला त्यांनी सुरुवात केली. या दोघांनीही आम्ही यांना सोबतच आहोत आणि सोबतच राहणार आहोत असे जाहीर केल्यानंतरही हे सरकार दोन महिने सुद्धा चालणार नाही असे भाकीत केले जाऊ लागले. यापूर्वीचा एकही भाकीत खरं झालं नाही. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक भाकीत केल आहे.
वास्तविक राजकीय भाकीत करण्यासाठी ते प्रसिद्ध नाहीत. पण तरीही महाराष्ट्र आणि हरियाणा येथे सत्तांतर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळणार असे भाकीत करताना त्यामध्ये नेमके तर्कशास्त्र (लॉजिक) त्यांनी सांगितलेले नाही.
गेल्या दोन अडीच वर्षांत महाराष्ट्रातल्या राजकारणात, तसेच सत्ता संघर्षात अनेक भाकिते राजकारण्यांनी अनेकदा केली आहेत. संजय राऊत यांच्यासारख्यांनी तर सरकार कधी कोसळणार याचा महिना सुद्धा सांगितला होता. आतापर्यंतची राजकीय भाकिते वास्तवात आलेली नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आता त्यावर विश्वास ठेवत नाही.
आणि अशी भाकिते गांभीर्याने घेत नाही. हेच वास्तव आहे.
हेही वाचा:
अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!
“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा
‘राहुल गांधी हे मुस्लीम आहेत की ख्रिश्चन हे त्यांनाही माहिती नाही’; भाजपा आमदाराचं विधान चर्चेत