मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची(Temperature) घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे.
तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आणि परभणी इथं थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील परिसरामध्येसुद्धा थंडीनं जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरतील घाट क्षेत्रांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईतही थंडीची जबर पकड पाहायला मिळत आहे. तिथं कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी वगळता उर्वरित भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून सातत्यानं येणारे थंड वारे राज्यात प्रवेश करताना त्यांचा थेट संबंध ताशी 25-30 किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांसोबत येत आहे. ज्यामुळं राज्यातील किमान तापमानात(Temperature) मोठ्या फरकानं घट होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन महिने राज्यासह देशातही थंडीसाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरचा काळ हा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी पूरक मानला जातो, पुढे डिसेंबरमध्ये मात्र वादळाची ही शक्यता कमी होते. परिणामी कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तापमानात घट होण्याची शक्यता तुलनेनं कमीच आहे.
हिमालय आणि उपहिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे राज्यासह देशातून थंडी इतक्यात काढता पाय घेण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय या क्षेत्रांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं होणारी बर्फवृष्टी पाहता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत थंडी पाठ सोडणार नाही असंच चित्र आहे. फक्त देशातच नव्हे तर राज्यात यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!
मनसेप्रमुख राज ठाकरेंना धक्का; ‘इंजिन’ जाणार अन् मान्यताही रद्द होणार?
आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…