प्रकाश आवाडे यांचं औट घटकेचं आव्हान…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ(element) आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून आवडे घराण्याची ताकद आहे. त्याच जोरावर मंत्रिपदे, खासदारकी, आमदारकी, नगराध्यक्ष पद अशी अनेक पदे त्यांच्याकडे आली. अशी सन्मानाची पदे मिळूनही त्यांनी काँग्रेसच्या “हाता” ची साथ सोडली. आत्ता या घटकाला त्यांची अवस्था”कोणता झेंडा घेऊ हाती”अशी झाली आहे. तिसऱ्या पिढीतील राहुल आवाडे यांच्यासाठी”राजमार्ग” तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रकाश आवाडे यांनी महायुतीला औट घटकेचे आव्हान दिले होते. ते अपक्ष आमदार असल्यामुळे त्यांनी बंड केले असे म्हणता येणार नाही.

कल्लाप्पांना आवाडे हे आमदार(element), राज्यमंत्री होते, त्यांनी दोन वेळा खासदारकी मिळवली होती. प्रकाश आवाडे हे सुद्धा 1989 च्या दरम्यान सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्याच घरात किशोरी आवाडे यांच्या माध्यमातून इचलकरंजीचे नगराध्यक्ष बरीच वर्षे होते. आवाडे घराणे हे काँग्रेसशी एकनिष्ठ. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला पण कल्लाप्पाण्णा आवाडे हे शरद पवारांशी घट्ट मैत्र असूनही त्यांच्यासोबत गेले नाहीत. पण प्रकाश आवाडे यांनी काही वर्षांपूर्वी ताराराणी आघाडीची स्थापना केली. त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. अगदी अनपेक्षितपणे ते हिंदुत्वाचा विचार अप्रत्यक्षपणे मांडू लागले. त्यांच्यातील हा वैचारिक बदल अनेकांना आश्चर्यचकित करून गेला होता. हिंदुत्व विचाराशी सलगी केल्यामुळेच ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले नंतर ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य बनले.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत राहुल आवाडे यांच्यासाठी प्रकाश आवाडे यांना एक राजमार्ग तयार करावयाचा आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीवर विशेषतः भारतीय जनता पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. लोकसभा निवडणूक मी लढवणार आणि जिंकणार. जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनाच तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन देणार असेही त्यांनी सांगून टाकले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकरंगी लढतीत
महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे अडचणीत येऊ शकतात. मत विभाजनाचा फटका त्यांना बसू शकतो.

प्रकाश आवाडे हे अपक्ष आमदार असल्यामुळे त्यांची उमेदवारी ही महायुतीसाठी बंड ठरू शकत नव्हती. एकूणच महायुतीची मोठी अडचण त्यांच्यामुळे झाली होती. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे कुटुंबीयांशी चर्चा केली आणि त्यानंतरच आवाडे यांनी लोकसभेच्या आखाड्यातून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यांनी शिंदे यांच्याकडून राहुल आवाडे यांच्यासाठी राजकीय शब्द घेतला असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

इचलकरंजी मध्ये भाजपचे सुरेश हाळवणकर हे एक प्रस्थापित नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये पुरेशी स्पेस आवाडे यांना मिळणे कठीण आहे. पुन्हा माघारी काँग्रेसमध्ये जाणे हा एक पर्याय असला तरी तो ते सहजासहजी स्वीकारतील असे नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांना इचलकरंजी शहरात किती मते मिळतात यावर त्यांना इचलकरंजीतील काँग्रेसची सद्यस्थिती नेमकी काय आहे हे समजणार आहे. कदाचित ते शिंदे यांच्या शिवसेनेचा विचार करू शकतात. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शब्द दिला असेल.

प्रकाश आवाडे यांना त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना राजकीय क्षेत्रात मजबूत झालेले पहावयाचे आहे. आवाडे घराण्याची तिसरी पिढी पाय घट्ट रोवून राजकारणात उभी करण्यासाठी प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न आहेत. आणि या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी महायुतीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व काही औट घटकेचे ठरले. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत आवाडे कुटुंबीयांच्या राजकीय ताकतीचा कस लागणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम

विशाल पाटलांच्या बंडखोरीनं ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली, संजयकाकांना फायदा होणार?

वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्याकडून सूचक संकेत