मुख्यमंत्र्यांनी, प्रतिष्ठेची केली कोल्हापूरची निवडणूक….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसात कोल्हापूरचा दोन वेळा दौरा(tour) केला आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक वेळा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे आपल्या गटाच्या दोन्ही उमेदवारांचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने ते सोमवारी कोल्हापूरला आले होते. दोन्ही उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाचे साक्षीदार बनलेले आणि नेतृत्व करणारे ते कोल्हापूरकरांच्यासाठी पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणातून आमदार प्रकाश आवाडे(tour) यांनी माघार घेणे ही मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यातील महत्त्वाची घडामोड समजली जाते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे तेरा खासदार गेले होते त्यामध्ये हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा समावेश होता.

सोबत आलेल्या सर्वच खासदारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार पूर्वक सांगितले होते. तथापि लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही मावळत्या खासदारांना उमेदवारी देण्याबद्दलचा निर्णय घेण्यास उशीर लावलेला होता. या दोघांचेही पत्ते कापले जाणार अशी चर्चाही त्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाली होती. मंडलिक आणि माने या दोघांच्या बद्दल त्यांच्या मतदारसंघात तीव्र स्वरूपाची नाराजी असल्याच्या कारणावरून निर्णय घेण्यास विलंब होत होता. अखेर या दोघांनाही उमेदवारी मिळाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना पुन्हा चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता त्यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली गेली आहे. या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येतात, यावरूनच त्यांनी कोल्हापूरची ही निवडणूक चांगलीच मनावर घेतलेली आहे असे स्पष्ट होते.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरात त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची
संयुक्त बैठक घेतली होती. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी महायुतीच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले होते. सर्व प्रकारच्या राजकीय जोडण्या करून ते मुंबईला परतले होते आणि काही तासांचा अपवाद करून ते पुन्हा सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपल्या ताराराणी आघाडीच्या वतीने आपण निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुती समोर अडचण निर्माण केली होती.

आपण नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आलो आहे. निवडणूक जिंकणार आणि मोदी यांना समर्थन देणार असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते. प्रकाश आवाडे हे अपक्ष आमदार असून भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील ते सहयोगी सदस्य आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात त्याबद्दलचे चर्चा सुरू झाली होती.

हातकणंगले आणि कोल्हापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या वाटणीला आलेले आहेत. त्यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघात विद्यमान मावळत्या खासदारांना पुन्हा संधी दिल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी केलेली राजकीय अडचण दूर करण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर येऊन पडली होती.
ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आणि आवाडे यांनी आपण लोकसभेचे रिंगण सोडत असल्याची घोषणा केल्याने मोठी राजकीय अडचण आता दूर झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तीन-चार महिन्यातच विधानसभा निवडणुकांचे बिगुल महाराष्ट्रात वाजणार आहे. आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम लोकसभा निवडणूक आहे. या रंगीत तालमीच्या यश अपयशावर विधानसभेचा फड रंगणार आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणही वेगळे वळण घेणार आहे.

लोकसभा निवडणुकीत घवाघवीत यश आले तर विधानसभा जिंकणे फारसे कठीण नाही असा विचार करून महायुती मधील घटकपक्ष कामास लागलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे भवितव्य सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून असल्याने त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा जिंकण्यासाठी त्या सर्वच अतिशय प्रतिष्ठेच्या करून टाकल्या आहेत. जे आपल्या बरोबर आले त्या खासदारांना, पुन्हा निवडून आणणे हे मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांच्या समोर आहे.

हेही वाचा :

रोहित शर्मासाठी पंजाब किंग्सची मालकीन प्रीति झिंटाने लावली फिल्डिंग!

बेरोजगारी रोखण्यासाठी मोदी-योगींनी एकही मुल…; खासदाराचा व्हिडिओ डीपफेक असल्याचा भाजपचा दावा

हातकणंगलेमध्ये ट्विस्ट; आवाडेंची समजूत काढण्यास मुख्यमंत्र्यांना यश; आवाडे लोकसभेच्या रिंगणाबाहेर