राजर्षी शाहूंच्या “जिवंत” स्मारकाचा देखिला मृत्यू!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजश्री शाहू महाराजांच्या सांस्कृतिक कार्य कर्तुत्वाचा(memorial) जिवंत स्मारक असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री अग्नीने स्वाहा केले. कोल्हापूरचा एक ऐतिहासिक ठेवा, वास्तु सौंदर्य जळून खाक होत असताना हजारो करवीरवासीयांनी पाहिला. अनेक कलाकारांनी एका नाट्यगृहाचा मृत्यू होताना पाहिला. ही केवळ ऐतिहासिक वास्तू बेचीराख झाली नाही तर सांस्कृतिक आणि कला विश्वाच्या मूक साक्षीदाराचा कोळसा झाला आहे. खाऊ गल्लीच्या गर्दीत सापडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत कांडाला, शोकांतिकेला महापालिका प्रशासनाची बेपरवाई जबाबदार आहे. शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नव्हते.

मराठी रंगभूमी आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह यांचं एक अतूट(memorial) नातं आहे. राजश्री शाहू खासबाग मैदानातील आखाड्यात आपली एक तरी कुस्ती झाली पाहिजे असे देशातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं. अगदी त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहात आपल्या नाटकाचा, संगीत मैफलीचा एकतरी प्रयोग झाला पाहिजे अशी प्रत्येक कलाकार आणि गायकाची तसेच व्यावसायिक आणि हौशी नाट्य संस्थांची इच्छा असायची. तमाशा, किर्तन, लावणी, साकी, दिंडी, फटका, वाघ्या मुरळी, भजन, ध्रुपद, धुमार, ठुमरी, गझल आणि नाटक अशा कितीतरी कलाप्रकार आणि लोककला यांचं सादरीकरण या नाट्यगृहात झाले आहे.

ग्रीक रोमन पद्धतीचं देशातील पहिलं कुस्ती मैदान बांधून पूर्ण झाल्यावर म्हणजेच इसवी सन 1912 नंतर आपल्या संस्थानात एक चांगले नाट्यगृह असले पाहिजे. असा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती मैदानास खेटूनच ते बांधण्याचे ठरवले. कागलचे ओव्हरसीयर जेव्हा कृष्णाजी चव्हाण यांनी या नाट्यगृहाचा नकाशा तयार केला. बाळकृष्ण गणेश पंडित यांना हे नाट्यगृह बांधण्याचे कंत्राट देण्यात आले. 1913 मध्ये बांधकाम सुरू होऊन ते 1915 मध्ये पूर्ण झाले. त्याला पॅलेस थिएटर असे नाव देण्यात आले. युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. बालगंधर्व यांच्याबरोबर “संयुक्त मानापमान”या नाटकाचा प्रयोग करणारे कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक कलाकार संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे नाव या पॅलेस थिएटरला नंतर देण्यात आले.

कोल्हापूर संस्थानात नाटक किंवा तत्सम कलाप्रकार सादर करण्यासाठी लक्ष्मी थिएटर, शिवाजी थिएटर, पवार मेढे यांचे शनिवार थिएटर म्हणजेच सध्याचे शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप, सरदारांचे वाडे, कर्वेनगर वाचन मंदिर, तसेच विद्यमान राजाराम माध्यमिक विद्यालयाच्या ऐतिहासिक वास्तू मधील सभागृह असे काही तेव्हा पर्याय होते पण ते परिपूर्ण नव्हते. तेव्हा करवीर संस्थानात किर्लोस्कर मंडळी, कोल्हटकर, ललित कला दर्श अशा महाराष्ट्रातील नामवंत नाटक कंपन्या नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी येत असत. नारायणराव कारखानीस आणि नरहरबुवा सरडे या कोल्हापुरातील पहिल्या नाटक कंपन्या यांच्यासाठी सुसज्य नाटक थिएटर पाहिजे म्हणून तत्कालीन पॅलेस थिएटर म्हणजे आत्ताचे केशवराव भोसले नाट्यगृह बांधण्यात आले.

शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर महापालिकेकडे हस्तांतरित केले. महापालिकेचे स्थायी समिती सभापती आणि संगीत नाटकाचे ठेकेदार सुभाष वोरा यांनी या नाट्यगृहाचे पहिल्यांदा नूतनीकरण केले. या नाट्यगृहाचे दोन वेळा नूतनीकरण करण्यात आले आणि त्यावर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. अगदी अलीकडच्या काळात पाच कोटी रुपये या नाट्य घराच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आले. अगदी सुरुवातीला हे नाट्यगृह वातानुकूलित नव्हते. म्हणून पु. ल. देशपांडे यांच्या “ती फुलराणी” या नाटकाचे प्रयोग होत नव्हते. म्हणून मग नूतनीकरणांमध्ये वातानुकूलित यंत्रणेवर प्रचंड पैसे खर्च करण्यात आले.

कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या केशरा भोसले नाट्यगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे महापालिका प्रशासनाने फारसे लक्ष दिले नव्हते. नाट्यगृहास खेटून असलेल्या ऐतिहासिक कुस्ती मैदानाकडे तर साप दुर्लक्ष होते. कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाच्या बाजूनेच ही आग लागली आणि ती नाट्यगृहापर्यंत पोहोचल्यानंतर काही जणांचे तिकडे लक्ष गेले. एक वर्षांपूर्वी कुस्ती मैदानाची दगडी भिंत कोसळून त्याखाली एक महिला गाडले गेली होती.

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या(memorial) परिसरात खाऊ गल्लीचा वेढा पडला आहे. सायंकाळी तर खाऊ गल्लीत होणाऱ्या गर्दीने केशवराव भोसले नाट्यगृहाचे अस्तित्वच काही तासांसाठी गायब होते. या नाट्यगृहाचा जणू श्वासाचा कोंडला होता. ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या दोन हेरिटेज म्हणून नोंदल्या गेलेल्या वास्तू असूनही तेथेच खाऊगल्ली करण्याचे कल्पना दारिद्र्य महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचले. वास्तविक या दोन्ही वास्तू नागरिकांना स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत याचे भान महापालिका प्रशासनाला राहिले नाही.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही आग लागली. आग कशामुळे लागली याची चौकशी होईल. काहीतरी कारण सांगितले जाईल. हे नाट्यगृह मूळ स्वरूपात बांधण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाईल. राज्य शासनाकडून त्याच्यासाठी भरघोस निधी मिळेल. येत्या एक-दोन वर्षात या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण होईल. पण नाट्यगृहाच्या मूळ वास्तूचे प्रत्येक कलाकाराला आणि कोल्हापूरच्या लोकांना स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा :

नीरज चोप्राने जिंकले रौप्यपदक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पाचवे पदक

पूजा खेडकरच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल, पुण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप

महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्लॅनची घोषणा: 20 ऑगस्टपासून सात विभागांत प्रचार दौरे