भय इथले संपत नाही….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, त्यांची केली जाणारी हत्या(murder) हा प्रकार वाढतच चालला आहे आणि आता तो सामाजिक जागृती आणि सामाजिक आत्मचिंतनाचा विषय बनला आहे. बदलापूर, बानगंगा येथील चिमूरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अद्यापही ताज्या असताना कल्याण मध्ये अशीच एक घटना घडली असून तेथील वातावरण सुन्न तसेच शोक संतप्त बनले आहे.

एका लहान मुलीचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, नंतर तिची (murder)हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहेच पण जनक्षोभ उसळू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर सारखी परिस्थिती कल्याण मध्ये निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने वेगवान तपासाबरोबरच पुरेसी खबरदारी घेतलेली दिसते. विशाल गवळी या नराधमाच्या पोलिसांनी गजानन महाराजांच्या शेगाव येथून मुसक्या आवळून त्याला कल्याण मध्ये आणले गेले आहे.

त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर नराधम विशाल गवळी हा एका बारमध्ये गेला आणि तेथे अतिशय निर्विकार चेहऱ्याने त्याने मद्य सेवन केले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे.

यावरून तो किती नीच आहे हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे लहान मुलीची हत्या करून हा नाराधम गजानन महाराजांची पवित्र भूमी असलेल्या शेगावला गेला. तेथून तो आपल्या पत्नीशी सतत संपर्कात होता. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. विशाल गवळी यांनी यापूर्वी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. तो काही काळ तुरुंगात होता. जणू काही आपण पराक्रम करून बाहेर पडतो आहोत अशा प्रकारची खूण करून तो तुरुंगाच्या बाहेर पडताना चा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. एकूणच त्याची मानसिकता हैवानालासुद्धा लाजवणारी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तातडीने निषेध केला आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे घडले हा सामाजिक आत्मचिंतनाचा विषय आहे. आणि सामाजिक जागृती ही झाली पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

या घटनेचा सर्व थरातून निषेध होतो आहे आणि तो झालाच पाहिजे. अशा प्रकरणात तपास आणि न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पडली पाहिजे. संबंधिताला देह दंडाची शिक्षा होईल इतका सखोल तपास करून तपास अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा केले पाहिजेत. शिक्षा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही जलद गतीने झाली तर लोकांचा न्यायावरचा विश्वास वाढेल.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात लहान मुलींवरील तसेच महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ का झाली आहे याचा विचार करून, त्यावर संबंधितांनी उपाययोजना सांगितल्या पाहिजेत. एक प्रकारचे सामाजिक आत्मचिंतन या निमित्ताने झाले पाहिजे. लैंगिक अत्याचार गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी हे त्या मुलीचे किंवा तरुणीचे जवळचे नातलग असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सापडलेले संशयित आरोपी हे 95% जवळपासचे नातलग असल्याचे एका आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे.

मुलींच्यावर, विशेषता तरुण महिलांच्यावर अत्याचार करण्यासाठी नराधमांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवलेल्या आहेत. आता एक नवीनच प्रकार होताना दिसतो आहे. एखादा लहान मुलगा हातामध्ये चिट्ठी घेऊन, मला माझे घर सापडत नाही, असे पुरुष मंडळींना नाही तर महिलांना सांगतो आणि या पत्त्यावर मला तुम्ही सोडा अशी विनंती करतो. लहान मुलाची दया आल्यामुळे एखादी महिला त्याला घेऊन तो सांगत असलेल्या पत्त्यावर जाते आणि तिथेच ती फसते. कारण या पत्त्याच्या माध्यमातून ती महिला नराधमाच्या हवाली जाते. आणि मग त्या महिलेवर लैंगिक अत्याचार होतात.

पोलिसांनी याविषयी महिलांना तरुणींना सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचा मुलगा हातामध्ये कागद घेऊन उभा असलेला दिसला तर त्याला तो सांगत असलेल्या पत्त्यावर न सोडता सरळ नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये आणून सोडावे असे आवाहन पोलिसांनी एका स्वतंत्र निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

मनात वाईट हेतू ठेवून एखाद्या लहान मुलीला एकांतात नेणारे हे तिचे जवळचे नातलग असतात किंवा ओळखीचे असतात. संबंधित नराधम हा ओळखीचा किंवा नातेवाईक असल्यामुळे ते अजान बालिका त्याच्याबरोबर जाते आणि बळी पडते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनीही केवळ सावधच नव्हे तर अति जागृत असले पाहिजे. तरच अशा प्रकारच्या घटना घडण्यास प्रतिबंध बसेल.

हेही वाचा :

2024 मध्ये सत्यात उतरले बाबा वेंगांचे ‘हे’ 3 भाकीत, आश्चर्यचकित करणारे खुलासे!

दोन सख्ख्या बहिणींचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडले, घराच्या शेजारीच…

कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार: देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप, आयुक्तांना दिले कडक आदेश