राजर्षी शाहूंच्या जिल्ह्यात घड्याळाचे काटे उलटे फिरतात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर(kolhapur) जिल्ह्याच्या गडहिंग्लज शहरात एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकाला जोगता करून देवाला सोडण्याचा झालेला प्रयत्न राजर्षी शाहू(Rajarshi Shahu) महाराजांच्या पुरोगामी विचारांना जबरदस्त धक्का देणार आहे. विशेष म्हणजे देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवून राज्य शासनाला या प्रथेविरुद्ध कायदा करण्यास भाग पाडणाऱ्या प्रा. विठ्ठल बन्ने यांच्या जन्म आणि कर्मभूमीत अशा लांछनास्पद प्रकार घडला आहे. अंधश्रद्धा, अंधविश्वास विरोधी लढाई आता अधिक टोकदार झाली पाहिजे हे अधोरेखित करणारी ही घटना आहे. मानवाच्या बुद्धी पलीकडे कृत्रिम बुद्धी कडे झेप घेणाऱ्या 21 व्या शतकात जोगता बनवण्याचा प्रयत्न व्हावा ही समाजाला अंतर्मुख करणारी बाब आहे.

गडहिंग्लज शहरातील एका बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक युवक सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेतो आहे. त्याला अचानक मान दुखीचा त्रास सुरू झाला. मणक्याची संबंधित असलेले हे दुखणे फारच वाढले. वैद्यकीय उपचार घेऊनही त्यात सुधारणा होईना. म्हणून मग त्याच्या आई-वडिलांनी तांत्रिक मांत्रिकाचा सल्ला घेतला. त्यांना कुणीतरी सांगितले की तुमच्या या मुलाला जोगता बनवून देवाला सोडा (यल्लमा देवीला). त्याला जोगता बनवले तर त्याचा मान दुखीचा आजार पूर्णपणे बरा होईल.

अंधश्रद्धेचा प्रसार करणाऱ्या कुणातरी या व्यक्तीचा त्या युवकाच्या आई-वडिलांनी सल्ला मानला. आणि त्याला जोगता बनवण्यासाठी धार्मिक विधी करण्याचे आयोजन करण्यात आले. एका शिक्षित युवकाला देवाला सोडण्याचा कार्यक्रम होतो आहे हे कोणा तरी सुज्ञ माणसाला समजले आणि त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने जोगता म्हणून सोडण्याच्या धार्मिक विधीला विरोध केला. त्या युवकाच्या आई-वडिलांना समजावून सांगितले आणि त्यानंतर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या त्या आई-वडिलांनी माफी मागून आमच्याकडून आता इथून पुढे असा काही प्रकार घडणार नाही असे लेखी लिहून दिले.

गडहिंग्लज मधील प्रा. विठ्ठल बन्ने यांनी विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात देवदासी प्रथेविरुद्ध एक चळवळ उभा केली होती. त्या काळात यल्लमा देवीला देवदासी म्हणून मुलींना तसेच तरुणींना सोडण्याचे प्रकार वाढले होते. ही अघोरी प्रथा मोडून काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच प्रा. विठ्ठल बन्ने यांनी एक प्रभावी आंदोलन उभा केले होते. राज्य शासनाने देवदासी प्रथेविरुद्ध प्रतिबंधक कायदा करावा ही मागणी तेव्हा करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा संमत केला. जोगता किंवा देवदासी हे प्रकार अघोरी आहेत. एखाद्यावर त्याची इच्छा नसताना लादणारे आहेत.

हे कळून आल्यानंतर हे प्रकार कमी झाले होते. राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात संस्थानातील स्त्रियांना प्रतिष्ठा देण्याचे कसोशीने प्रयत्न केले होते इतकेच नव्हे तर स्त्रीला न्याय देणारा कायदा तेव्हा पारित केला होता. राजर्षी शाहू महाराज हे अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. त्यांना पुरोगामी विचारांचा राजा म्हणून देशभर ओळखले जात होते. आणि त्यातूनच कोल्हापूर(kolhapur) ही महाराष्ट्राची पुरोगामी विचारांची राजधानी म्हणून ओळख निर्माण झाली होती. या पुरोगामी विचारांच्या राजधानीत जोगता सोडण्याचा प्रयत्न व्हावा हेच मोठे दुर्दैव आहे.

देवदासी बनवण्याची तसेच जोगता बनवण्याची प्रथा पूर्णपणे संपुष्टात आली आहे असे म्हणता येणार नाही. सात आठ वर्षांपूर्वी देवदासी तसेच जगता या प्रकारावर परखड भाष्य करणारे “कथा नाम्या जोग्याची”असेच”जोगवा”हे दोन मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले होते. जोगता किंवा देवदासी यांचे भविष्य किती भयावह आणि भीषण असते याचे वास्तव दर्शन या चित्रपटांनी घडवले होते.

सुमारे 40 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरात एका लहान मुलीला देवदासी अर्थात तिचे देवाशी लग्न लावण्याचा प्रयत्न मंगळवार पेठ परिसरात झाला होता. त्या विवाहाला प्रा.डॉ. रूपा शहा यांनी घटनास्थळी जाऊन विरोध केला होता. यासंदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तेव्हा गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर कोल्हापूर(kolhapur) शहरात असा प्रकार पुन्हा घडला नाही.

अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अनेक प्रकार कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात घडले आहेत. गुप्तधन, दाम दुप्पट रक्कम, या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचे प्रकार गेल्यावर्षी कोल्हापुरात घडले होते. याशिवाय करणी धरणी, भानामती असे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे प्रकार घडले आहेत. असे प्रकार राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात घडावेत हे सुद्धा अति दुर्दैवी म्हणावी लागेल.

हेही वाचा :

अर्थसंकल्पामध्ये मोठ्या वल्गना अन् पोकळ घोषणा; राजू शेट्टी यांची जोरदार टीका

वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल

‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, शनी करणार इच्छापूर्ती