प्रचारातला शिमगा आणि आरोपांची धुळवड सुरूच!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीच्या(continue sentence) निमित्ताने प्रचाराचा शिमगा आणि आरोपांची धुळवड एकाच वेळी सुरू आहे आणि ती थांबण्याची चिन्हे नाहीत. निवडणूक निकालानंतरही शिमग्याचे कवित्व विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहणार आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कारवाईचे आव्हान आणि माफी मागण्याचे आवाहन केले आहे. सुनील तटकरे यांनी गौप्यस्फोटाच्या मालिकेत आपली भागीदारी नोंदवलेली आहे तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या तथाकथित अटकेवर चर्चा सुरू केली गेली आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, ते महाविकास(continue sentence) आघाडीत मंत्री असताना राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून अटकेची भीती घालण्यात आली होती. ही अटक टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली असा आरोप ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सत्तेवर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची तयारी सुरू होती. त्यामुळेच ठाकरे सरकार कोसळले असे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच दीपक केसरकर वगैरे मंत्रांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून खुलासा होणे गरजेचे आहे, मात्र खुलासा केला तर आपणही राजकारणाचा एक भाग होऊ अशी भीती असल्यामुळे हा खुलासा झालेला नसावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले असताना शरद पवार यांनी त्यांना थेट आव्हान आणि आवाहन केले आहे. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेस कडून विशेषतः अजितदादा पवार यांच्याकडून झाला असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. आता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांनी अशा प्रकारची कारवाई करावी किंवा मग महाराष्ट्राची माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावर अशा प्रकारची टीका पहिल्यांदाच झालेली आहे असे नव्हे. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची टीका त्यांच्यावर झालेली आहे पण एकदाही त्यांनी या संदर्भात तोंड उघडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर 70000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करूनही अजितदादा पवार यांना सत्तेत घेतल्याबद्दल सर्व सामान्य लोकांच्याकडून आजही सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे, मात्र त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या तोंडपाटीलकीसाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा अद्यापही केला गेलेला नाही.

पहाटेच्या तथाकथित शपथविधीच्या चर्चेला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही आणि तो मिळण्याची शक्यताही दिसत नाही. कारण त्यावर अजून चर्चा सुरूच आहे. आता अजितदादा गटाचे सुनील तटकरे यांनी गौप्यस्फोट मालिकेत, स्वतःचा सहभाग नोंदवलेला आहे. त्यांनीही भाजप बरोबर युती करायला शरद पवार यांचे समर्थन होते असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील या दोघांनी तर मंत्री पदाच्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून चर्चा केली होती. असेही त्यांनी म्हटले आहे. पहाटेच्या शपथविधी बद्दल देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी खुलासे आणि प्रत्येक खुलासे केल्यानंतर आता सुनील तटकरे यांनी ही चर्चा पुढे चालू ठेवली आहे. सर्वसामान्य जनतेला या पहाटेच्या शपथविधी बद्दल आता कोणत्याही प्रकारचे औत्सुक्य राहिलेले नाही.

जे महाराष्ट्रात घडते आहे तेच कोल्हापुरातही घडताना दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची पातळी अगदी खालच्या स्तरापर्यंत आलेली आहे. माजी पालकमंत्री, काँग्रेसचे विद्यमान आमदार सतेज पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम सुरू केलेली आहे. उमेदवारांची जुगलबंदी राहिली बाजूला, या निवडणुकीत स्वतःच उमेदवार असल्यासारखे हे दोन्ही नेते बोलू लागले आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या दोघांच्या कडून परस्परांवर आरोपांची चिखलफेक सुरू आहे. याच मतदारसंघात प्रभाव असलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही, बेताल बोलण्याचे खाते उघडले आहे.

शरद पवार यांना उद्देशून त्यांनी “खत्रुड म्हातारं, कमरेला किल्ल्या लावून फिरतय “अशी भाषा वापरलेली आहे. त्याआधी एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी, मंत्रीपद गेल्यावर कोण कुत्र विचारत नाही. माझं मंत्रिपद गेल्यावर माझ्या जवळ कुणी फिरकत सुद्धा नव्हतं, माझा फोन कोणी उचलत नव्हत. अशी खंत जाहीरपणे बोलून दाखवणाऱ्या सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांच्या बद्दल मत कुणी गांभीर्याने घेईल असे त्यांना तरी वाटतंय का?

हेही वाचा :

काँग्रेसची भूमिका छळाची, ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नाही; नसीम खान कडाडले

सांगलीच्या खेळीचे ‘खलनायक’ जयंत पाटील… माजी आमदारांचा गंभीर आरोप

कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका