कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सिंहासन, सरकारनामा, अपहरण, न्यू दिल्ली टाइम्स, राजनीति, आंधी हे मराठी(new movies) आणि हिंदी चित्रपट राजकारणावर, राजकारण्यांच्या कूट नीतीवर, चाणक्य नीती वर, साम,दाम, दंड आणि भेद नीती यावर प्रभावी भाष्य करणारे होते. आणि ते मोठ्या पडद्यावर तुफान चालले. या सर्व चित्रपटांच्या कथा काल्पनिक होत्या पण वास्तव आणि वास्तवातील दाहकता दाखवणाऱ्या होत्या. तथापि महाराष्ट्रातील राजकारण्यांनीच मराठी, हिंदी चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले तर? हे चित्रपट तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालतील. शंभर कोटीच्या क्लब मध्ये जातील. ऑस्कर साठी मानांकन सुद्धा होईल. पण सध्या तरी एकमेकांना धमक्या देण्यासाठी काही राजकारण्यांकडून चित्रपट काढण्याची भाषा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय गुरू धर्मवीर आनंद शिंदे यांच्या जीवनावरील”धर्मवीर”हा चित्रपट(new movies) तीन वर्षांपूर्वी निर्माण केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला खास करून उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार हे प्रीमियर शोला उपस्थित होते. तेव्हा झालेली भाषणे पूर्णपणे राजकीय होती. मी चित्रपट काढण्याचे ठरवले तर काहीजणांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे देवेंद्र फडणीस यावेळी म्हणाले. आता त्यांच्यावर पलटवार करताना संजय राऊत यांनीही तीच भाषा वापरली आहे. तेही म्हणतात आम्ही चित्रपट काढला तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही.
आम्ही चित्रपट काढायचे ठरवले तर ही भाषा म्हणजे “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, खाऊन कोण तृप्त झाला?”अशा स्वरूपाची आहे. पण या राजकारण्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवलेच तर त्यांच्या चित्रपटांचे नाव काय असेल?”आम्ही, खरेच सांगू असे नाही” किंवा “श्रीमान असत्यवादी” किंवा “आम्ही सत्तावादी”असे काही त्यांची नावे असू शकतील. महाविकास आघाडी, महायुती या आघाडींची पटकथा किंवा स्क्रिप्ट ज्यांनी लिहिली त्यांच्यावर या चित्रपटाची लेखनाची जबाबदारी देता येऊ शकते. त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस, संजय राऊत हे दोघेही पटकथा चांगले लिहू शकतील.
राऊत हे पत्रकार आहेत आणि फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे या दोघांनाही पटकथा लिहिण्यात कोणती अडचण येणार नाही. चित्रपटांची निर्मिती मूल्ये चांगली असतील. तो भव्य असेल. स्टार कास्ट तगडी असेल. कारण पैशाची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. कारण धर्मवीर या चित्रपटाच्या दोन्ही भागाची निर्मिती मूल्ये खूप श्रीमंत आहेत आणि होती.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मैत्र 25 वर्षापासूनचे आहे. अगदी 2019 च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र होते. सत्ताही त्यांनी एकत्र भोगली आहे. त्यामुळे एकमेकांचे गुणधर्म त्यांना माहित आहेत.
याशिवाय परस्परांची व्यंग स्थळे, परस्परांनी केलेले गैरव्यवहार माहित असणारच. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मंत्र्यांकडून अनपेक्षित असे काही घडले असणार, आणि हे सर्व महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवले आहे. तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असे फडणवीस, राऊत म्हणतात याचा अर्थ जे काही घडले आहे ते भयंकर आहे असा होतो. आणि त्यांनी हे जनतेला अंधारात ठेवून केले आहे, हे त्यापेक्षाही भयंकर आहे. आणि म्हणूनच या दोघांच्या कडूनही ते म्हणतात तसा चित्रपट निर्माण केला जाणार नाही, त्यांना ते राजकीय दृष्ट्या परवडणारे सुद्धा नाही. कारण हे दोघेही सत्तावादी आहेत. घोषणा करतील आणि सोयीनुसार विसरून जातील. भविष्यात राजकीय सोय म्हणून एकत्र ही येतील. म्हणूनच”धर्मवीर”च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर “बिन पैशाचा तमाशा”चे प्रयोग सुरू झाले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. आरोपांची लक्तरे प्रचार सभेत वाळत घातली जातील. चित्रपट काढण्याऐवजी, चित्रपटाचे स्क्रिप्ट सांगितले जाईल.
हेही वाचा :
कोल्हापुरात माकडाच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी
मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ पदार्थ..
अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर