कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशाच्या, राज्याच्या विकासाशी निगडित राजकारण(politics) असलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे समाधान शोधण्यावर राजकारण केले पाहिजे. निकोप राजकारणावर भर दिला पाहिजे. राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. प्रत्येक गोष्टीत ओढून ताणून राजकारण आणता कामा नये. पण गेल्या काही वर्षांपासून इथलं राजकारण “मुद्द्याचं सोडून” चाललं आहे.
आधी इतिहास पुरुषांना, नंतर राष्ट्रपुरुषांना आणि आता “सर्व साक्षी” देवाला सुद्धा राजकारणात (politics)आणून त्यांचं राजकीय भांडवल केलं जात आहे. किमान देवाला तरी राजकारणाचा विषय बनवू नका, देवाला तरी सोडा” असे उपहासात्मक आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आंध्र प्रदेशातील राजकारण्यांना केले आहे.
तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा लाडू तयार करताना तूप वापरले जातेच शिवाय या तुपात जनावरांची चरबी मिसळली जाते असा सनसनाटी आरोप आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकताच केला आहे. त्यांना यानिमित्ताने आंध्रामध्ये त्यांच्या आधी सत्ताधारी असलेल्या वर निशाणा साधावयाचा असावा. त्यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. तिरुपती बालाजी चा प्रसाद म्हणून भक्तांना लाडू दिला जातो.
हा लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तुपात चरबी मिसळली जाते. हे अजून सिद्ध झालेले नाही. पण त्या आधीच चंद्रबाबू नायडू यांना हा विषय मीडियासमोर आणण्याची काय गरज होती? किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई, न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने आंध्र सरकारला खडसावले आहे. हा विषय इतका संवेदनशील आहे की पुराव्याशिवाय तो मध्यमात मांडला जातो. वास्तविक हा विषय पुरावा असला तरी गोपनीय ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी भाविकांच्या श्रद्धेच श्राद्ध घालण्याची काहीही गरज नव्हती.
लोकसभा निवडणुकीत आणि निवडणुकीच्या निकालानंतरही देशातील विशेषता महाराष्ट्रातील काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी अयोध्येचा राम हा राजकारणात आणला होता. अयोध्येत राम मंदिर बांधूनही तुमचा उमेदवार तिथे पडला. तुम्हाला तुमचा राम पावला नाही अशी टीका या पक्षाच्या नेत्यांनी केली होती. अयोध्या येथे राम मंदिर निर्माण होण्यापूर्वीही अयोध्येचा राम हा भारतीय जनता पक्षांनेही राजकारणाचा विषय केला होता. काही महिन्यापूर्वी छगन भुजबळ यांनी शाळेमध्ये सरस्वतीची प्रतिमा कशाला असा सवाल केला होता. एकूणच या देशातील आणि या राज्यातील राजकारण्यांनी देवाला राजकारणात अनन्य साधारण महत्व दिलेले दिसते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात(politics) उद्धव ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा एक संघर्ष उभा राहिला आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याचे टीका भाजपने केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अहमदशा अब्दाली चे उपमा दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज मोठे असे वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते किंवा नाही यावर काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात चर्चा रंगली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की खंडणी मागितली यावर वाद निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात या विषयावरून कलगीतुरा रंगला होता.
भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील वगैरेंना राजकीय विषय बनवून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्याबद्दलचा खुलासा करताना चंद्रकांत दादा पाटील यांना नाकी नव आले होते. आता अगदी चारच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी श्रीमती ऋत्ता आव्हाड यांनी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची तुलना आतंकवादी लादेन याच्याशी केली होती.
एकूणच भारतीय राजकारणात तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात देवाला सुद्धा आणले जाते. देवाच्या नावावर राजकारण केले जाते. त्याला आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सुद्धा अपवाद नाहीत. किमान परमेश्वराला तरी राजकारणापासून दूर ठेवा असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केले असले तरी त्याला प्रतिसाद मिळणार नाही हे कोणीही “देवाची शपथ” घेऊन सांगेल.
हेही वाचा:
इस्रायलने हिजबुल्लाहला समाप्त करण्यासाठी ‘ऑपरेशन नॉर्दर्न एरो’ सुरू केला
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला, सत्ता टिकवण्यात अपयश! – देवेंद्र फडणवीस
इचलकरंजीतील पाण्यासाठीचे आंदोलन अधिक ताकदीने उभा करू – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले