काँग्रेसने दुरुस्त केलेले “उत्तर” महायुतीला खडतर आव्हान!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजू लाटकर यांच्या नावाची करण्यात आलेली घोषणा ही मुद्दाम जाणीवपूर्वक केलेली चूक होती किंवा लेटमस पेपर टेस्ट होती काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण काँग्रेसकडून(Congress) अवघ्या 36 तासात “चूक” दुरुस्त करून कोल्हापूरचे “उत्तर” दिले आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर आता खडतर आव्हान उभे राहिले आहे, की कालपर्यंत त्यांची वाट सुकर समजली जात होती.

काँग्रेस(Congress) पक्षाकडून महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, राजू लाटकर यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. काँग्रेस पक्षात अगदी नव्यानेच आलेल्या लाटकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कोल्हापुरात काँग्रेस अंतर्गत असंतोषाची”लाट”निर्माण झाली होती. 27 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी लाटकर यांच्या नावाला तीव्र विरोध केला होता. या विरोधाची दखल घेऊन काँग्रेसच्या पंचांगातून काढण्यात आलेला “लाटकर” मुहूर्त अवघ्या 36 तासात बदलण्यात आला. आणि नंतर सर्वमान्य उमेदवार म्हणून मधुरिमा राजे छत्रपती यांचे नाव जाहीर करण्यात आले.

काँग्रेसने दुरुस्त केलेल्या “उत्तर”चे कार्यकर्त्यांनी सोमवारी जल्लोषी स्वागत केले. वास्तविक मधुरिमा राजे छत्रपती यांनाच काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार होती. पण अगदी सुरुवातीलाच त्यांच्या नावाची घोषणा केली तर नवीन राजवाड्यात दोन पदे कशासाठी? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या कडून विचारला जाऊ शकतो. म्हणून मग लिटमस पेपर टेस्ट म्हणून राजू लाटकर यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावाला प्रचंड विरोध झाल्यानंतर नवीन राजवाड्यावर काँग्रेस नेत्यांची दिवसभर खलबते झाली आणि मग नंतर मधुरिमा राजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लाटकर यांच्या पेक्षा कितीतरी पटीने उत्तम उमेदवार म्हणून त्यांच्या उमेदवारीचे अर्थातच स्वागत करण्यात आले. म्हणूनच काँग्रेसने अगदी सुरुवातीला राजू लाटकर यांचे नाव जाहीर करून मुद्दाम चूक केलेली होती की काय अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची वाट सुखकर केली होती, त्यांच्या तुलनेत क्षीरसागर हे तगडे उमेदवार मानले जात होते. खुद्द क्षीरसागर यांनी काँग्रेसला(Congress) निष्ठावंत उमेदवार देता आला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करून काँग्रेस मधील काही मातब्बर मंडळींना अप्रत्यक्षपणे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी दुपारी काँग्रेसने आपली चूक दुरुस्त करून माधुरी यांच्या नावाने”उत्तर”दिल्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. कारण मधुरिमा राजे हे महायुतीच्या क्षीरसागर यांच्यासमोर खडतर आव्हान उभे राहिले आहे.

मधुरिमा राजे ह्या माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या असल्यामुळे त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळालेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी मधुरिमा राजे यांनी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती. त्यांच्यात नेतृत्व गुण असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापुरात सुरू होती.

आता कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघात मधुरिमाराजे छत्रपती विरुद्ध राजेश क्षीरसागर यांच्यात लढत होणार आहे. एका अर्थाने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना आहे. म्हणूनच दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेच्या कमालीच्या पातळीवर नेण्यात आली आहे.

हेही वाचा :

महाविकास आघाडीत पुन्हा ‘सांगली पॅटर्न’…

आयपीएल २०२५ चे रिटेन्शन कधी, कुठे लाइव्ह विनामूल्य पाहायचे?

सलमान खानला पुन्हा धमकी, तर झिशान सिद्दिकी रडारवर; फोन करत केली मोठी मागणी