शरद पवार (political news)नेहमीच शर्यतीवर डाव लावतात. जिंकणारा घोडा ते निवडतात, याची प्रचिती अनेकवेळा आली आहे. पॉवरबाज वस्तादाने समरजिसिंह घाटगे यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्यावर शरसंधान साधले आहे. निवडणुकीपूर्वी टाकलेले वस्तादाचे डावपेच मुश्रीफ उलथवून टाकणार? राजा विरुद्ध प्रजा अशीच यावेळची देखील निवडणूक होणार आहे.
मुश्रीफ यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय (political news)अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. घाटगे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरसावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कुरघोडीच्या राजकारणात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.
खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत चैतन्य, तर महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडी भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली. तर महायुती बॅकफूटवर गेली असल्याचे चित्र आहे. महायुतीचे हसन मुश्रीफ, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी डावपेच आखले जात आहेत.
आपल्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या मागे नेतेमंडळी का लागली आहेत अशी विचारणा करून मुश्रीफ यांनी अब समरजित तेरी खैर नही, निवडणुकीत कोण नायक आणि खलनायक आहे, हे सिद्ध होईल. राजा विरुद्ध प्रजा अशीच निवडणूक होईल असे स्पष्ट केल्याने वातावरण ढवळले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक प्रखर होत चालला असून, कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघातील घाटगेंच्या प्रवेशामुळे मुश्रीफांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
राधानगरी मतदारसंघात अजित पवार गटाबरोबर गेलेले माजी आमदार के. पी. पाटील यांची घरवापसीची वाट सुकर झाली आहे. आपण अजित पवार गटात गेलोच नव्हतो, असे सांगत ते ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून लढू इच्छित आहेत. त्यांचे मेहुणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी रीतसर काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. भाजपचे राहुल बजरंग देसाई यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीच्या कोट्यातून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. यात कोण बाजी मारणार? याचा फैसला तिकीट वाटपात होणार आहे.
घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कागलमध्ये गैबी चौकात मुश्रीफ यांच्याविरोधात पवार यांनी घाटगे यांच्या माध्यमातून दंड थोपटले आहेत. गतवेळेपेक्षा यंदा मुश्रीफ यांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. घाटगे हे भाजपातून महाविकास आघाडीत आल्याने आघाडी अंतर्गत राजकीय मैत्रीची समीकरणे भक्कम होणार आहेत. अनेक मतदारसंघांत साटेलोटे एकमेकांच्या पथ्यावर पडणार आहे.
शरद पवार यांचे अत्यंत जवळचे, एकनिष्ठ असलेले हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ धरली. तेव्हापासूनच मुश्रीफ यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समरजित घाटगे अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता हेरून शरद पवार यांनी व्ही. बी. पाटील यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या गोटात खेचून आणले. घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरला आहे.
कागलचे पडसाद कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमटणार आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील. या मतदारसंघातील अनेक गावे घाटगे यांच्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असतात. कागल उत्तर भागात पाटील यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे घाटगे-पाटील या दोघांना एकमेकांची मदत पूरक ठरेल.
कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज तालुक्याचा बराचसा भाग आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन्ही दिवंगत आमदारांच्या कन्यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घाटगे यांना होऊ शकतो. प्रदेश जनता दलाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या, माजी नगराध्या स्वाती कोरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांची मदत महत्त्वाची ठरू शकते. चंदगड, राधानगरीत ऐनवेळी महाविकास आघाडीकहून नवा चेहरा आखाड्यात उतरवून वस्ताद राखून ठेवलेला डाव टाकणार का?अशी देखील जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा:
पत्नीला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या भावाने थेट भावालाच संपवलं
आता डेटवर जाण्यासाठी थेट पगारी सुटी, कंपनीच्या नव्या निर्णयाची जगभर चर्चा
‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा!’ ‘धर्मवीर 2’चा दुसरा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित