कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या(Assembly) निवडणुका होत आहेत. त्या आता नजीकच्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असल्याने राज्य पातळीवरील राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काहींचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. जे राज्यात चालू आहे तेच जिल्हा पातळीवर सुरू आहे.
कोल्हापूर जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही. इथेही संदर्भ बदलले आहेत, समीकरणे बदलली आहेत. जागावाटप निश्चित झाल्यानंतर इथल्या इच्छुक उमेदवारांच्या मोर्चे बांधणीला गती येणार आहे. पण तरीही करवीर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघात पारंपारिक लढती होतील. कोल्हापूर उत्तर मध्ये मात्र इच्छुकांची मांदियाळी आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा पूर्णपणे शहरी आहे. या मतदारसंघावर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने आपली मोहर ऊमटवली आहे. श्रीमती जयश्री जाधव ह्या विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उभाठा सेनेने या मतदार संघावर हक्क सांगितला आहे. तर महायुती मधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या जागेचा आग्रह धरला आहे. संभाजी राजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा उमेदवार इथे असू शकतो. या शहरी मतदार संघाचा राजकीय प्रवास हा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून अति उजवीकडे असा आहे.
महाविकास आघाडीतील उभाठा सेनेकडे हा मतदारसंघ गेला तर शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे उमेदवार असतील. अर्थात त्यांच्याही वाटेत शिवसेना अंतर्गत गटाने काटे पेरले आहेत. काय करू आणि काँग्रेस कडे हा मतदारसंघ गेला तर विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्याशिवाय महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, मधुरिमा राजे छत्रपती यांची नावे चर्चेत आहेत.
जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे समर्थन असणाराच उमेदवार ठरणार आहे. मधुरिमा राजे यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांचे सासरे श्रीमंत शाहू छत्रपती हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचा किती विचार होईल हा प्रश्न आहे. मुळातच श्रीमंत शाहू छत्रपती कडून त्यांच्या नावाचा आग्रह धरला जाईल असे संभवत नाही.
कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेला तर माजी आमदार राजेश क्षीरसागर हे महायुतीचे उमेदवार असतील. मात्र या मतदारसंघावर तसेच कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने आपला हक्क सांगितला आहे. त्यांचा हा हक्क मान्य केला गेला तर क्षीरसागर यांची राजकीय पंचाईत होणार आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपने मागितल्यामुळे क्षीरसागर यांच्याकडून उघड उघडपणे नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घेतला तर या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारे सत्यजित कदम, तसेच खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यापैकी कुणालातरी एकाला उमेदवारी मिळू शकते. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात तब्बल 80 हजार मते घेतली असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्याकडून शिंदे शिवसेना गटाला सोडला जाईल असे वाटत नाही.
करवीर मध्ये पारंपारिक लढत
करवीर विधानसभा(Assembly) मतदार संघाचे विधानसभेवर नेतृत्व करणारे काँग्रेसचे पी. एन. पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आकस्मिक निधन झाले आहे. या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील.
तर त्यांच्या विरुद्ध शिंदे शिवसेना गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे उमेदवार असतील. हा असा एक मतदारसंघ आहे की तेथे आजपर्यंत पाटील विरुद्ध नरके असा सामना झाला आहे. त्याच्याही आधी या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे संपत बापू पवार पाटील हे दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी पी एन पाटील यांचा पराभव केला होता. आता मात्र त्यांनी पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना पाठिंबा जाहीर करून महाविकास आघाडी धर्माचे पालन केलेले आहे.
करवीर विधानसभा(Assembly) मतदार संघामध्ये राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके अशी लढत होईल. पी एन पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर या मतदारसंघांमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीचा काँग्रेस फायदा घेणार आहे.
हा मतदारसंघ पूर्वी सांगरूळ या शीर्षक नावाने ओळखला जात होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव बोंद्रे यांनी तो बांधला आहे. ते या मतदारसंघातून निवडून जात होते. नंतर विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करताना करवीर हा मतदारसंघ उदयास आला.
महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या राहुल पाटील यांना हा मतदारसंघ जाणार म्हणून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करून आपली उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे.
कोल्हापूरचे “दक्षिणा”यण
…………………………..
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा(Assembly) मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात कोल्हापूर महापालिकेचे 28 प्रभाग येतात. या मतदारसंघात अगदी सुरुवातीपासून महाडिक विरुद्ध पाटील अशी पारंपारिक लढत होत आली आहे. हा मतदारसंघ कधी काँग्रेसकडे तर कधी भारतीय जनता पक्षाकडे राहिला आहे. सध्या राष्ट्रीय काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे विद्यमान आमदार आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ जाईल. अर्थात काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हेच असतील. हा मतदारसंघ पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाकडे राहिलेला आहे. भाजपकडून महाडिक गटाला
उमेदवारी दिली जाणार आहे.
अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका यांना भाजपची उमेदवारी मिळेल. या मतदारसंघात काँग्रेसचे सतेज पाटील आणि भाजपच्या महाडिक कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या मतदारसंघात पूर्वीच्या कागल विधानसभा मतदारसंघातील 22 गावे येतात. या गावात समरजीत घाटगे यांच्या गटाचा प्रभाव आहे. हा गट कोणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर इथली विजयाची गणिते अवलंबून आहेत.
हेही वाचा:
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी
लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण…
विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा