तापलेल्या आरक्षण विषयावर त्या दोघांची भूमिका संदिग्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मराठा आरक्षण(reservation) प्रश्नातून निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीवर तोडगा काढण्यात महायुतीचे सरकार अपयशी ठरले असल्याचा अप्रत्यक्ष ठपका ठेवून छगन भुजबळ यांनी सोमवारी अचानक भेट घेऊन शरद पवारांना साकडे घातले. त्यानंतर मराठा आणि ओबीसी वादात तोंड उघडलेल्या शरद पवार यांनी महायुतीच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. तर वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला नव्याने कुणबी दाखले देण्यात येऊ नयेत अशी मागणी करून आरक्षण बचाव यात्रा कोल्हापुरातून सुरू करण्याचा निर्णय घोषित केला आहे. एकूणच आरक्षण प्रश्नावर या दोघांनी घेतलेल्या भूमिका स्पष्ट नाहीत तर संदिग्ध स्वरूपाच्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना गेल्या वर्षी पहिल्यांदा उपोषण(reservation) सोडताना आणि नंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणते आश्वासन दिले? आणि आता ओबीसी नेत्यांशी त्यांनी काय चर्चा केली? याचे तपशील आम्हाला सांगितले नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहिले नाहीत. कसा खुलासा शरद पवारांनी पहिल्यांदाच केला पण त्यातून काही प्रश्नच उपस्थित होताना दिसतात.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते का? देता येत असेल तर ते कोणत्या मार्गाने? याबद्दल त्यांनी राज्यकर्त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. आरक्षण देण्यात घटनात्मक अडचणी येत असतील तर तसे त्यांनी धाडसाने सांगितले पाहिजे.

आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेले असामाजिक वातावरण संपुष्टात आणण्याविषयी त्यांनी ठोस उपाय योजना स्पष्ट केल्या पाहिजेत. पण त्यांच्याकडून असे काही होताना दिसत नाही. आंदोलनकर्त्यांशी सरकारने काय चर्चा केली याचे आधी तपशील उघड करा अशी ते अट घालून संदिग्धता निर्माण करत आहेत. ज्यांचे राजकारण कळत नाही त्यांना शरद पवार म्हणतात हे पुन्हा एकदा त्यांनीच आरक्षण विषयावरून अधोरेखित केले आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे आवाहन सरळ सरळ धुडकावून लावलेले आहे असे त्यांच्या भूमिकेवरून लक्षात येते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावर पहिल्यांदा भेट देणारे शरद पवार हे पहिले राजकारणी जसे आहेत तसेच वंचित चे प्रकाश आंबेडकर यांचेही नाव घ्यावी लागेल कारण ते अंतरवाली सराटी या गावी गेले होते. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षण लढायला पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे संविधानात कुठेही म्हटलेले नाही. मराठा समाजाने आम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहोत हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध केले तर त्यांना आरक्षण देण्यात कोणतीच अडचण येणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. वंचित ची सत्ता आली तर आम्ही मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देऊ शकतो पण त्याचे तपशील अप्पांनी सांगणार नाही असेही ते तेव्हा म्हणाले होते. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आंबेडकर यांच्याकडे ठोस उपाय आहे. मग ते हा उपाय शासनकर्त्यांना का सांगत नाहीत?

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण(reservation)मिळण्यात अडचण नाही पण शासनाने असे दाखले देण्याचे आता थांबवावे असे आवाहन करून ते सुद्धा संदिग्ध भूमिकेत दिसतात. दिनांक 26 जुलै पासून आपण कोल्हापुरातून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू करणार आहोत अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगर येथे मीडियाशी बोलताना केली आहे. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे यासाठी यात्रा सुरू करणारे आंबेडकर यांनी यू टर्न घेतला आहे. गेल्या वर्षीच्या भूमिकेशी त्यांनी पूर्णपणे फारकत घेतली असल्याचे स्पष्ट होताना दिसते आहे.

छगन भुजबळ हे महायुती सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत. पण मराठा आरक्षण विषयावरती ओबीसी नेते म्हणूनच आज पर्यंत व्यक्त झाले आहेत. आता तर विरोधी महाविकास आघाडीचे नेते असलेल्या शरद पवार यांनाच साकडे घालून महायुतीचे सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी सर्वच विषयांवर त्यांचा अभ्यास असतो असे नाही असेही त्यांनी त्यांच्याबद्दलचे मत व्यक्त करून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री, विरोधी नेत्याकडे जाऊन आता तुम्हीच हस्तक्षेप करा, मार्गदर्शन करा असे आवाहन करतो हे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आणि राजकारणात पहिल्यांदाच घडले आहे. आरक्षण विषयावर तोडगा काढण्यासाठी आपल्याच सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री महाविकास आघाडीच्या नेत्याकडे जातो आणि त्याबद्दल महायुतीच्या इतर नेत्यांना काहीच वावगे वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे.

हेही वाचा :

दारूच्या नशेत माजी नगरसेवकाच्या पुत्राने हॅरियर कारने टेम्पोला उडवलं, दोघे जखमी

विशाळगडावर घडलेली घटना ही दुर्दैवी! शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध …

ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण