लोकसभा निवडणुकीतून विधान सभेचा”राज”मार्ग..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया(political) न देणारे, राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंद झाल्यानंतर, अजितदादा पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर सर्वाधिक संतप्त झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललय? असा उदवेगजनक सवाल उपस्थित करून त्यांनी”एक सही संतापाची”हे अभिनव आंदोलन केले होते.

दोन पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाखालील महायुतीचे(political) सरकार आले, त्याचे मनापासून स्वागत न करणारे, पाडापाडीच्या राजकारणाचा ठाकरी भाषेत उपहास करणारे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून”महायुती “ला या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा”राज”मार्ग त्यांनी मनसेच्या सैनिकांना सांगितला आहे.

मुंबईच्या शिवतीर्थावर मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर मनसे मेळावा घेतला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या या मेळाव्याच्या सभेला विक्रमी गर्दी झाली होती. विक्रमी गर्दीच्या सभा हे राज ठाकरे यांचे बलस्थान आहे. ते लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आणण्यासाठी पायघड्या घातल्या होत्या.

अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षावर टीका करणारे राज ठाकरे महायुतीत जाणार नाहीत अशी चर्चा सुरू होती. पण संदीप देशपांडे हे अचानक सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर चर्चेचे स्वरूप बदलले. राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार असे बोलले जाऊ लागले. मुंबईतील एक आणि नाशिकची जागा त्यांच्यासाठी सोडली जाणार, किंवा मनसेला विधानपरिषद आणि राज्यसभा मिळणार, राज ठाकरे हे शिंदे गटात जाऊन शिवसेना प्रमुख बनणार अशा बिन बुडाच्या बातम्या मीडियातून च पेरल्या जाऊ लागल्या. त्यासाठी सुत्राचा हवाला नेहमीप्रमाणे दिला जाऊ लागला. ह्या सुत्रा च्या
गोत्रावर राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हल्लाबोल केला.

अमित शहा यांची नवी दिल्लीत खास विमानाने जाऊन भेट घेऊन आल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. जे काही बोलायचे आहे ते गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर बोलेन असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता त्यांनी याच मेळाव्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणूक लढवणार नाही पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा असे आवाहन त्यांनी मनसेच्या सैनिकांना केले आहे. याचा अर्थ असा आहे की लोकसभेनंतर चार-पाच महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची मनसे ही महायुती बरोबर असेल असा होतो.

2014 मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या शपथविधीचे खास निमंत्रण राज ठाकरे यांना होते. नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्यावर टीका करू लागले होते. नोटांचे फक्त रंग बदलले अशा शब्दात त्यांनी नोटबंदी निर्णयावर टीका टिपणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या एका जाहिरातीवर त्यांनी तुफान टीका केली होती. जाहिरातीतील खोटेपणावर त्यांनी नेमके बोट ठेवले होते.

महाराष्ट्रातील राजकारणाचे जे संदर्भ बदलले, जे प्रवाह बदलले, जी नव्याने समीकरणे आली, राजकीय सभ्यता ढासळली, हे सर्व भारतीय जनता पक्षामुळे घडले आहे. या सर्व घडामोडीमुळे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झाली आहे अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात राज ठाकरे यांचे भारतीय जनता पक्ष किंवा महायुती यांच्याशी पटणार नाही असे बोलले जात होते.

पण नंतर महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक स्पेस तयार करणे आवश्यक आहे, असा विचार करून त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला अर्थात भारतीय जनता पक्षाला बिन शर्थ पाठिंबा जाहीर केलेला दिसतो. वास्तविक महाराष्ट्राच्या गेल्या पाच वर्षाच्या बदलत्या राजकारणात एक सशक्त पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढे येण्यासाठी अतिशय चांगले राजकीय वातावरण होते. त्याचा फायदा राज ठाकरे यांना घेता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात महायुती मधील नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदार्पणातच 13 जागा जिंकून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना तसेच राजकीय विश्लेषकांना चक्रावून टाकले होते. आता तीच जादू आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्याकडून साध्य होईल का?

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-04-2024)

ज्यांना निवडून दिले ते बिनकामाचे निघाले;

गुजरात टायटन्सने रोखली राजस्थानची विजयी वाटचाल