घरच्यांना सुरक्षित ठेवून त्यांना हवी आहे दंगल!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राज्यातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणाचा(family) एक अध्याय किंवा धडा समावेश केला गेला तर आणि त्यावरचे प्रश्न ऐच्छिक ठेवले तर कोणीही ते सोडवणार नाहीत. कारण हा अध्याय किंवा धडा कुणाला समजणार नाही इतका तो जटील असणार आहे. इथे कोणाला दंगली हव्या आहेत, तर कुणी थेट पोलिसांना कानाखाली आवाज काढण्याची धमकी देतोय, अल्पसंख्याक समाजाला घुसून मारण्याची भाषा करतोय तर आणखी कोणी वयाने ज्येष्ठ असलेल्या मंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे असं म्हणतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना तर सर्वांनीच वेठीस धरलय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही असा नवाच जावई शोध लावून वातावरण गढूळ केले जातेय.

मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात गेल्या आठवड्यात(family) ठाकरे गट आणि राणे गट समरासमोर आला. प्रचंड हाणामाऱ्या झाल्या. पोलिसांनी दोन्ही गटाच्या 50 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली, त्यात एकाही नेत्याचा किंवा त्यांच्या सुपुत्रांचा समावेश नाही. स्वतःचं कुटुंब पोलीस कारवाई पासून सुरक्षित ठेवून येथे आंदोलने सुरू आहेत, आणि आता एका नेत्याला महाराष्ट्रात दंगल का झाली नाही असा प्रश्न पडला आहे.

चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. पराभव का झाला याचे आत्मचिंतन करण्यात वेळ घालवणे अपेक्षित असताना महाराष्ट्रात दंगल झालीच पाहिजे असे ते म्हणतात. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा? दंगल का झाली नाही? असे प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारले आहेत. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याचा संजय राऊत यांनी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या विषयावर मौन पाळले आहे. दंगल झालीच पाहिजे अशी पोस्ट सोशल मीडियावर कोणी व्हायरल केली असती तर पोलीस प्रशासन शांत बसले असते का?

शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण या चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याला “स्लीप ऑफ टंग” म्हणतात. वास्तविक सात-आठ वाक्यांचा स्लिप ऑफ टंग होत नाही. एखादा शब्द जिभेवरून घसरला तर त्याला स्लिप ऑफ टंग म्हणतात. इथे तर चंद्रकांत खैरे यांनी दंगल का होत नाही यावर सात आठ वाक्यांची टिपणीच केली आहे. वास्तविक पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हा विषयच अतिशय संवेदनशील आहे. मालवण येथे राजकोट किल्ला परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात स्फोटक वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाशी फारकत घेणारे केलेले वक्तव्य वादग्रस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत दोन वेळा लुटली. सुरतला बदसुरत केले. हा इतिहास आहे. तो शालेय अभ्यासक्रमातून वर्षानुवर्षे शिकवला जातो आहे. तथापि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नाही. सुरत मधील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला असे अनैतिहासिक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांनी विरोधकांच्या हाती एक नवा मुद्दा दिलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भारतीय जनता पक्षाकडून (family)वारंवार केला जातो आहे. असा आरोप होऊ लागल्यानंतर कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना, मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसचे राजवट असताना तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जेसीबी यंत्र लावून हटवण्यात आले होते तेव्हा ही मंडळी कुठे होती असा सवाल महायुतीच्या नेत्यांकडून उपस्थित केला जातो आहे आणि या प्रश्नाला समाधानकारक उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अद्याप देण्यात आलेले नाही.

आमदार रितेश राणे हे अगदी अलीकडच्या काळात कडवे हिंदुत्ववादी बनले आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर हिंदूंचा नेता बनावयाचे आहे असे दिसते. अमरावती,अहमदनगर, इस्लामपूर येथील त्यांची भाषणे भडक आहेत. घुसून मारीन, पोलीस अधिकाऱ्याला तू हिंदू नाहीस काय? आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. ही त्यांची भाषा गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही काय? ही मीडियाच्या प्रतिनिधीच्या हातातील बुम हिसकावून घेण्याचा नारायण राणे यांनी केलेल्या प्रयत्न समर्थनीय आहे काय? असे काही प्रश्न शांतताप्रिय नागरिकांच्याकडून उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा:

अंबाबाईच दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती

भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने उचललं सर्वात मोठं पाऊल