सत्ता वर्तुळात रमणाऱ्यांना “शेतकरी” कळलाच नाही!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अवकाळी अस्मानी संकटाने शेतकऱ्याची(farmers) उभी पिके झोपतात. शेतकरी हतबल होतो. तेव्हा त्याला दिलासा देण्याऐवजी त्याच्या आत्मसन्मानावर नांगर फिरवला जात असेल तर सत्ता वर्तुळात रमणाऱ्यांना खऱ्या अर्थाने शेतकरीच कळला नाही असे म्हणावे लागेल. महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना भिकाऱ्यांच्या रांगेत उभे करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा आत्मसन्मान पुन्हा डिवचला आहे. शेतकऱ्यांची चूक इतकीच झाली की त्यांनी कृषिमंत्र्यांना “शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा देणार?” हा प्रश्न विचारला.

भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही. पण आम्ही एक रुपयात पिक विमा काढून दाखवला आहे. असे उपकारी भाषेत बोलताना आपण शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करत आहोत हे माणिकराव कोकाटे यांना समजलेच नाही. शेतकरी संघटनांच्या कडून, विरोधी पक्ष नेत्यांच्याकडून जोरदार निषेध होऊ लागल्यानंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली असेल असे वाटत असताना पुन्हा एकदा त्यांच्याकडून शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कुठल्याशा द्राक्ष बागेत गेले होते. येथे जमलेल्या काही शेतकऱ्यांनी “शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी?” हा प्रश्न विचारला एवढेच निमित्त झाले. घेतलेले कर्ज फेडायचे नाही. शासनाकडून कर्जमाफी होईल म्हणून वाट बघायची. पोरांचे साखरपुडा करायचे, लग्न समारंभ करायचे. पण शेतीत पैसा गुंतवायचा नाही. अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना फटकारले. कर्जमाफी राहू दे, आमच्या कृषी मालाला रास्त भाव द्या असे एका शेतकऱ्याने म्हटल्यावर त्यांना उत्तर देता आले नाही.

शेतकऱ्यांच्या(farmers) घरात मंगल कार्य, साखरपुडा, विवाह असे काही होऊच नये असे कोकाटे यांना वाटते काय? मागे एकदा केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली होती. या राज्यातील, या देशातील शेतकरी कर्जबाजारी का होतो याचा या मंडळींनी कधी अभ्यास केला आहे काय? एकदा त्यांनी शेतकऱ्यांच्या थकलेल्या कर्जा मागच्या कारणांचा शोध घ्यावा. पण तसे काही न करता शेतकऱ्यांनाच दुषने द्यायची, त्यांनाच फटकरायचे. शेतकऱ्यांना समजून घ्यायचे नाही. माणिकराव कोकाटे यांनी जी काही मुक्ताफळे उधळलेली आहेत, त्याबद्दल शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या कडे सरासरी तीन एकर जमीन आहे. देशातील शेतकरी कुटुंबाचे वर्षाला सरासरी 77,124 रुपये इतके उत्पन्न आहे. म्हणजे दरमहा सरासरी 6427 रुपये इतकी इतके उत्पन्न आहे. त्यातील मासिक खर्च 6223 रुपये गृहीत धरला तर दरमहा दोनशे चार रुपये शिल्लक राहतात. महिन्याच्या खर्चात औषध वगैरे इतर खर्च धरलेला नाही.
याचा अर्थ शेतकरी हा दारिद्र्यरेषेच्या थोडेसे वरती जीवन जगतो आहे असा होतो. शेतीच्या उत्पन्नातून दर महिन्याचा जेमतेम खर्च भागवणारा शेतकरी, हा कर्जाचे हप्ते कसे फेडणार? याचा विचार माणिकराव कोकाटे यांनी करायला हवा.
पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, केरळ, कर्नाटक, गुजरात या राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे.

याशिवाय अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती कृषी मालाचे दर कोसळणे, अशी संकटे त्याच्यावर येत असतात. येत असलेली संकटे आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, यातून शेतकरी वैफल्यग्रस्त बनतो. त्याचे ताण तणाव वाढतात आणि मग तो कधी घरामध्ये तर कधी शेतातील झाडाला स्वतःला गळफासाने लटकावून घेतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. रोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करतात.

राज्याचा, देशाचा पोशिंदा, अन्नदाता स्वतःच अडचणीत आहे. त्याच्या अडचणी सोडवण्यापेक्षा त्याला फुकटचे सल्ले दिले जातात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सर्व थरातून सडकून टीका होत असताना त्यांचे नेते अजितदादा पवार काही बोलावयास तयार नाहीत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. वास्तविक कोकाटे यांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्ष नेत्यांनी आम्ही सत्तेवर आलो तर राज्यातील शेतकऱ्यांची(farmers) कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे कर्जमाफी केली जाईल असे महायुतीच्या एकत्रित जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटले होते. जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तर त्यांचे काय चुकले?

हेही वाचा :

मोठी अपडेट आरसीबीविरूद्ध रोहित शर्मा खेळणार नाही

आता खराब रस्ता असलेल्या गावांत बस सेवा होणार

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीची झालीये अशी अवस्था तो फोटो पोस्ट करत म्हणाली