आठ सामन्यांत सात पराभव. त्यात पराभवाचा लाजीरवाणा षटकारसुद्धा. साऱयांनीच म्हटले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (royal challengers bangalore)खेळ खल्लास. तेव्हा माझा एक मित्र म्हणाला, त्यांचा खेळ खल्लास नाही झालाय, आता ते कोमात गेलेत. कोमातून बाहेर आले तरी प्ले ऑफ गाठतील की नाही शंका आहे. पुढील सहाच्या सहा सामने जिंकूनही त्यांना काही फायदा होणार नाही आणि जरी ते सहा सामने जिंकतील, पण अन्य आघाडीच्या संघांचे पराभवही व्हायला हवेत ना. हे फक्त सिनेमात घडू शकते. चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. काल तो चमत्कार बंगळुरूने करून दाखवला. हार के आगे जीत है असे म्हणतात ना ते बंगळुरूने प्रत्यक्षात करून दाखवलेय, ते एका चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. कोमात गेलेला संघ कोमातून बाहेर येऊन लढतोय आणि जिंकतोय. हे चमत्कारिक आहे, अविश्वसनीय आहे.
बंगळुरू(royal challengers bangalore) सात पराभवांमुळे आयपीएलच्या प्ले ऑफच्या दावेदारांमध्ये कुठेही नव्हता. मुळात हा संघ पूर्ण स्पर्धेत कधीही अव्वल पाच संघातही आला नाही, पण पावसामुळे दोन सामने रद्द झाले आणि आयपीएलचे सारे समीकरणच बदलले. हैदराबाद-गुजरात यांच्यातील सामना पावसात वाहून गेला आणि प्ले ऑफच्या किनाऱयावर बसलेले दिल्ली व लखनऊसुद्धा त्या पावसात वाहून गेले. हाच तो दैवी चमत्कार ठरला. पूर्ण 55 दिवस स्पर्धेत कुठेही नसलेला बंगळुरूला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अंधूक आशा दिसू लागली.
गेल्या पाच सामन्यांतील विजयांमुळे बंगळुरूसाठी देवच वेगळी स्क्रिप्ट लिहीत असावा. काहीही झालं तरी ते पोहोचणार, असे वाटू लागले. त्यांचे नशीबच पाहा ना. शेवटचा सामना घरच्याच मैदानावर होता. पावसाचे संकट गहिरे होते. आदल्या दिवशी धो-धो पाऊस पडला होता. चेन्नईला पराभवानंतरही प्ले ऑफची संधी होती आणि बंगळुरूला 18 धावांनी विजय हवा होता. विजयाची एक धाव जरी कमी पडली असती तरी ते जिंकूनही हरले असते, पण दैव बंगळुरूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
चेन्नईला विजय नकोच होता. त्यांना फक्त 200 धावा गाठायच्या होत्या. शेवटच्या षटकात लक्ष्य 35 धावांचे असले तरी चेन्नईला 17 धावा काढायच्या होत्या. फलंदाजीला धोनी आणि जाडेजा हे फिनिशर होते. दोघे असूनही चेन्नई हरली. धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि यश दयालच्या दुसऱया चेंडूने त्याला फसवले. तो स्लोअर वन धोनीला महागात पडला. मग चार चेंडूंत 11 धावांची गरज असताना दोन चेंडू शार्दुलने खाल्ले आणि शेवटच्या दोन चेंडूंवर जाडेजाला एकही धाव काढता आली नाही. सारे काही अविश्वसनीय होते, पण ते खरे आहे. गेल्या वर्षी याच यश दयालला शेवटच्या षटकात 29 धावाही रोखता आल्या नव्हत्या. 5 चेंडूंत 28 हे अवघड आव्हान असताना रिंकू सिंहने सलग पाचही चेंडूंवर षटकार खेचत यश दयाल आणि गुजरात टायटन्सला वेडे करून सोडले होते. त्याच यश दयालने आज सर्वांची मने जिंकली. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, तो कायम राहणार. गेल्या वेळी पाच चेंडूंवर पाच षटकार देणाऱया यशने शनिवारी पाच चेंडूंवर अवघी एक धाव दिली. यालाच म्हणतात क्रिकेट.
असो, बंगळुरूने यंदाच्या आयपीएलमध्ये आधी पराभवाचा आणि नंतर विजयाचा षटकार ठोकून एक दुर्मिळ विक्रम रचला आहे. एकाच मोसमात एका संघाची अशी दोन टोपं पाहायला मिळणे खऱया अर्थाने अविश्वसनीय आहे. बंगळुरूच्या अपयशात जसा सर्वांचा सहभाग होता तसा विजयातही सर्वांची कामगिरी सामावली आहे. हे जे यश मिळवले आहे, ते एकटय़ा-दुकटय़ाचे काम नाही. विराट कोहलीने सर्वाधिक 708 केल्यात. कर्णधार फॅफ डय़ु प्लेसिस, रजत पाटीदार, पॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिक यांचाही सिंहाचा वाटा आहे. बंगळुरूच्या गोलंदाजीबद्दल फारसे बोलता येणार नाही. मोहम्मद सिराजच्या चेंडूला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. मात्र दयालने 15 विकेटचे यश मिळवलेय. ग्लेन मॅक्सवेलची बॅट अजूनही म्यानच आहे. मात्र प्ले ऑफमध्ये त्याची बॅट गोलंदाजांना बेचिराख करेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.
हेही वाचा :
आम्हाला अटक करा..’ CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा
सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी