कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चार वर्षांच्या खंडानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. पहिल्यांदा ते अमेरिकेचे(america) राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता आणि आता चार वर्षाच्या खंडानंतर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होताना त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात घट्ट मैत्री असल्यामुळे त्याचा फायदा अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्र अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील(america) हिंदू मतदारांच्यावर प्रभाव टाकला होता. माझे सर्वात घनिष्ठ मित्र नरेंद्र मोदी हे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळेच भारतासाठी डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक राजकारणात आश्वासक व्यक्तिमत्व ठरणार आहेत. जागतिक सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले पाहिजे ही अनेक वर्षांपूर्वी पासूनची मागणी भारताला आता अधिक नेटाने करता येणार आहे. तसे पाहिले तर या मागणीला अमेरिकेचा पूर्वीपासूनचा पाठिंबा आहे. आता त्याला अधिक जोर येईल.
ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली होती तेव्हा ट्रम्प मोदी यांच्यातील दोस्ताना सर्वांना दिसला होता. ट्रम्प यांच्या काळात भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध, बायोडेन यांच्या कार्यकाळात तितकेसे चांगले राहिले होते असे म्हणता येणार नाही.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट समजली जाते. तिथे अर्थात अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 538 इलेक्ट्रॉल कॉलेज असतात. त्याला निर्वाचन मंडळे म्हणतात. या निर्वाचन मंडळांपैकी 270 मंडळे ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकतो.
अमेरिकन निवडणूक प्रक्रिया साधारणतः सहा महिन्यापूर्वी पासून सुरू होते. नोव्हेंबर मध्ये निकाल जाहीर होतात मात्र सत्ताग्रहण सोहळा अर्थात नवीन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा हा दिनांक 20 जानेवारी रोजी होतो. सत्ता ग्रहणाची ही परंपरा इसवी सन 1937 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे अजून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी सत्ता ग्रहण करण्यासाठी आहे. या काळात राजनैतिक आणि प्रशासकीय स्तरावर बदल करण्याची प्रक्रिया सुरू होते. नव्याने सत्ता ग्रहण करणाऱ्या सरकारकडून रिक्त झालेली सुमारे 4हजार राजनैतिक पदे भरली जातात. त्यामध्ये देशोदेशी असलेल्या दुतावासांचाही समावेश असतो.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायोडेन यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा होता. कमला हॅरीस यांनी या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले होते. पण त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायोडेन यांचीच धोरणे पुढे चालवणार असल्याचे सुचित केले होते. तर विद्यमान सरकारची धोरणे ही सर्वसामान्य जनतेसाठी हिताची नाहीत. शक्तिमान राष्ट्र म्हणून अमेरिकेची ओळख कायम राखण्यात बायोडेन यांना अपयश आले.
अमेरिकेची(america) अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण या दोन मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक होऊन बोलताना दिसले. बायोडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर सर्वात प्रथम अफगाणिस्तान मधील अमेरिकन सैन्याला माघारी बोलावले. त्यामुळे तेथे तालिबानी ही धर्मांध सत्ता अधिकारावर आली. युक्रेन रशिया युद्ध सुरू झाले, हमास आणि इजरायल युद्ध सुरू झाले. आता तर त्याची व्याप्ती सर्व आखातापर्यंत पसरली आहे. युद्धखोर रशिया म्हणून अमेरिकेने अनेक निर्बंध लादले होते पण त्याचा दृश्य परिणाम काही दिसून आला नाही. चीनची ताकद वाढली. रशिया आणि चीन हे एकत्र येताना दिसले.
त्यामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेचा असलेला दबदबा कमी झाला. 24 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असूनही अमेरिकेला वाढत्या बेरोजगारी प्रश्नाला सामोरे जावे लागले. आर्थिक विषमता वाढली. देशाची सर्वाधिक संपत्ती ही दहा टक्के लोकांच्या हातात राहिली. या सर्व प्रतिकूल बाबींचा डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात चांगलाच फायदा घेतला. निर्वासित अर्थात घुसखोर प्रश्नावरही त्यांनी अनेकदा चिंता बोलून दाखवली. बायोडेन यांच्या धोरणामुळे अमेरिकेची जागतिक पातळीवरची पत घसरली हे डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय प्रभावीपणाने तेथील जनतेसमोर आणले आणि हे वास्तव आपण बदलणार आहोत हे तितक्याच ताकतीने सांगितले. अर्थात आपल्याकडे इसवी सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी जसे आम्ही सत्तेवर आलो तर अच्छे दिन येतील हे जसे सांगितले तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील जनतेला सांगितले.
भारत आणि अमेरिका(america) यांच्यात मैत्रीचे संबंध असले तरी भारतीयांच्या दृष्टीने काही समस्या सुद्धा आहेत. अमेरिकेच्या आयटी क्षेत्रातून भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या काही वर्षांपासून धोक्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेकडून आत्तापर्यंत जो वित्तपुरवठा पाकिस्तानला करण्यात आला आहे त्यातील बराचसा निधी पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरला आहे.
सध्या अमेरिकेने आणि जागतिक नाणेनिधीने पाकिस्तान बद्दलचा हात आखडता घेतला असला तरी भविष्यात तो तसाच राहील असे नाही. अमेरिकेकडून थेट पाकिस्तानला अडचणीत आणता येऊ शकते किंवा आणता येईल. आणि त्यामुळे भारतातील दहशतवादी कारवाया थांबतील किंवा त्या कमी होतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारतासाठी सहाय्यभूत होईल असे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
हेही वाचा :
सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी
शाहूवाडीत सावकार विरुद्ध आबा मतदार संघावर कुणाचा ताबा!
स्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विलियम्स अगदी ठणठणीत!