विज्ञानवाटा : संशोधनाची सुंदर संधी

मेक्सिको, अमेरिका, कॅनडाच्या टापूत दिसलेल्या(straw) खग्रास सूर्यग्रहणाने शास्त्रज्ञांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्कंठा जागृत झाली होती.

मेक्सिको, अमेरिका, कॅनडाच्या टापूत दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाने(straw) शास्त्रज्ञांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्कंठा जागृत झाली होती. त्यातील निरीक्षण, अभ्यासातून खूप माहिती मिळाली आहे. त्यातून संशोधनाला चालना मिळू शकते.

या वर्षीचे पहिले खग्रास सूर्यग्रहण आठ एप्रिल रोजी दिसले. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार प्रामुख्याने मेक्सिको, उत्तर अमेरिका आणि कॅनडामधील पावणेदोनशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात दिसला. एरवी न दिसणाऱ्या काळ्या सूर्यबिंबाभोवती प्रभामंडलाला यावेळी पाहून लोक संमोहित झाले. अमेरिकेतील तेरा प्रांतामधील अनेक मोठमोठ्या शहरात ग्रहण दिसणार असल्याने तेथील सरकारने ‘ग्रहण सुरक्षित कसे पाहावे’ याविषयी जागृती केली.

यावेळेच्या ग्रहणाचे आगळे वैशिष्ट्य होते. नजीकच्या काळात सूर्य त्याच्या अकरा वर्षांच्या डागांच्या चक्रामधील जास्त डाग दिसण्याच्या स्थितीत पोहोचणार होता. यामुळे काहीसा शांत दिसणारा सूर्य प्रक्षुब्ध होऊन त्याच्या बिंबावर मोठ्या प्रमाणात काळपट सौरडाग, अग्निज्वाला व अग्निशिखा दिसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच सूर्यबिंबाभोवताली असणारे प्रभामंडल (किरीट, करोना) काहीसे तेजस्वी आणि आकर्षक दिसण्याची शक्यता होती.

कदाचित याचमुळे अमेरिकेने या ग्रहणास ‘ग्रेट अमेरिकन एक्लिप्स’ असे नाव दिले. हे ग्रहण १८५ किलोमीटर रुंदीच्या आणि बारा हजार किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात साधारणपणे तीन ते साडेचार मिनिटभर खग्रास स्वरूपात दिसणार होते. मात्र या ग्रहणावर ढगांचे आणि पावसाचे सावट असल्याचा अंदाज वर्तविल्याने लोकांची धावपळ होती. डलास शहरात आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असल्याने आम्हीही डलासजवळच्या फ्रिस्को गावातील विलास देशपांडे यांच्या घरी पोहोचलो.

ग्रहणाचा दिवस उजाडला. दुपारी साडेबाराचा सुमार झाला, कडक ऊन पडले. काही वेळातच सूर्यबिंबाला अमावस्येच्या चंद्रबिंबाने झाकण्यास सुरूवात केली. आता कडाक्याचे ऊन कमी होऊ लागले व सूर्यप्रकाशात पिवळसर सोनेरी रंगांनी प्रवेश केला. अंधारल्यासारखे वाटू लागले. रस्त्यावरचे स्वयंचलित दिवे सुरू झाले. गुरू व शुक्र या ठळक ग्रहांनी सूर्याशेजारी चोर पावलांनी प्रवेश केला.

सूर्यबिंबाची कोर हळूहळू नाजूक होत गेली, शेवटी तेथे काही ‘मणी’ (बेलीज बीड) दिसू लागले. क्षितिजावरचे पांढरे शुभ्र ढग काळवंडले व चंद्राची सावली आपल्या अंगावरून पुढे गेल्याचे समजले. इकडे सूर्यबिंबावरचे मणी एकापाठोपाठ विझत गेले आणि शेवटचा मणी अतिशय तेजाने चमकू लागला. आता इतरवेळी कधीही न दिसणारे सूर्याभोवतालचे प्रभामंंडल (करोना) दिसू लागले.

याचमुळे हिऱ्याची अंगठी (डायमंड रिंग) चमकत असल्यासारखे वाटले. हळूहळू चंद्राने सूयबिंबाला पूर्ण झाकल्याने काळ्या बिंबाभोवतालचे प्रभामंडल विस्तारत गेल्यासारखे दिसले. अंतराळातील हा प्रेक्षणीय नजारा पाहून सर्वजण देहभान विसरून गेले. सर्वत्र थंडगार व गूढ वातावरण पसरले.

हेही वाचा :

कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!

महाराष्ट्र हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर

जावयाच्या वाढदिवसानिमित्त हटके फोटो शेअर करत सुनील शेट्टी म्हणाला, “हे एक कनेक्शन आहे …”