सत्ता ठेवायची आहे मुठीत असलं राजकारण गेलं चुलीत

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : इतिहास हा वर्तमान घडवत असतो आणि वर्तमानातून(politics) भविष्याचा वेध घ्यायचा असतो, असे म्हटले जाते. पण इतिहासातील खलना वर्तमान काळात आणून महाराष्ट्राचे भविष्य बिघडवण्याचे काम सध्या सर्व पक्षीय पातळीवर सुरू आहे. आणि त्यातून मत पेढी अर्थात व्होट बँक तयार करून ती आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मजबूत करावयाची आहे. या मंडळींना एक असामाजिक वातावरण तयार करावयाचे आहे. त्यासाठी प्रसार माध्यमे, आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जातो आहे आणि आता त्याची सुरुवातही झाली आहे.

राज्याची आणि राजकारणाची राजधानी मुंबई(politics)असली तरी पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर ही महानगरे प्रचाराची राजधानी बनली आहेत. गेल्या आठवड्यात पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचा महामेळावा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या ऐतिहासिक शहरात त्यांनी इतिहासातील खलपुरुष असलेल्या औरंगजेबला भाषणाच्या माध्यमातून वर्तमानात आणले.

उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागेल असे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष स्थान त्यांनी बहाल केले. मग त्याच पुणे शहरात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना जशास तसे उत्तर दिले. अहमदनगरचे राजकीय वंशज असा त्यांनी अमित शहांचा उल्लेख केला. भारतीय जनता पक्षाला घायाळ करण्यासाठी ठाकरे यांनी पुणे निवडले, त्याचेही काही खास कारण आहे. पुणे म्हणजे पेशवे. आणि विश्वासराव पेशवे हे पानिपतच्या लढाईत अब्दाली कडून कामी आले, म्हणजे धारातीर्थी पडले. हा इतिहास त्यांना अप्रत्यक्षपणे पुणेकरांच्या समोर आणावयाचा होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून औरंगजेबला थडग्यातून बाहेर काढले जाते. त्याचे उदात्तीकरणं केले जाते. त्यातून लोकांची माथी भडकवली जातात. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबच्या थोड्यावर चादर घालतात. त्याला अभिवादन करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून औरंगजेबाच्या वाड्याचा जिर्णोद्धार केला जावा अशी मागणी केली जाते.”औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे”असे वादग्रस्त वक्तव्य आहे त्यांनी केले होते. त्यातून मग औरंगजेब हा किती महान होता याचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले जाऊ लागले. हा सगळा प्रकार म्हणजे महाराष्ट्राला पेटवण्याचा उद्योग होता. कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर वगैरे भागात दंगलीही झाल्या. एकूणच हिंदूंना, शिवप्रेमींना डिवचन्याचा हा प्रकार होता. अर्थात तो राजकारण्यांचाच होता. खरे तर असले दळभद्री राजकारण लोकांनीच आता चुलीत घातल पाहिजे.

दिल्लीचा औरंगजेब, आदिलशाहीतला (politics)अफझलखान, आणि आता पानिपतच्या लढाईत पेशव्यांचा पराभव करणारा अब्दाली असे खलपुरुष प्रचारात आणले जात आहेत. खरे हिंदुत्ववादी कोण? हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक स्वर्गीय बाळासाहेब देवरस यांची पहिल्यांदाच आठवण करून दिली आहे. भारतीय जनता पक्षाच हिंदुत्व हे किती नकली आणि किती तकलादू आहे हे स्पष्ट करून सांगण्यासाठी स्वर्गीय देवरस यांनी इंदिराजी गांधी यांना लिहिलेल्या एका पत्राचे जाहीर वाचन केले आहे. भारतीय जनता पक्षाचे बलस्थान म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. ठाकरे यांनी त्यावरच प्रहार केला आहे.

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे सांगितले जाते. आता त्यात राजकारणाचाही समावेश केला गेला आहे. राजकारण्यांना सर्वकाही माफ असते. राजकारण्यांनी, नेत्यांनी बोलले पाहिजे पण काहीही बोलण्याचा अधिकार असल्यासारखे त्यांचे मौखिक वर्तन किंवा व्यवहार असता कामा नये. इतिहासातील खल पुरुषांना आणि महापुरुषांना वापरण्यासाठी किंवा त्यांच्यावर बोलण्यासाठी इतर व्यवस्था किंवा पर्याय उपलब्ध आहेत. समाज तोडण्यासाठी, सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी इतिहासाला अशा प्रकारे वर्तमानात आणणे हे पूर्णतः चुकीचे आहे. म्हणूनच या मंडळींचं मतासाठीच राजकारण आता मतदारांनीच चुलीत घातलं पाहिजे.

इसवी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्याकडून औरंगजेबाचा उल्लेख पहिल्यांदा करण्यात आला होता. महाराष्ट्रावर चाल करून येण्यासाठी दिल्लीवरून औरंगजेबाच्या फौजा येत आहेत अशा आशयाचा प्रचार तेव्हाच्या निवडणुकीत करण्यात आला होता. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा औरंगजेब महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वातावरण तयार करण्यासाठी आणला जातो आहे आणि आणला गेला आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना दिलासा! पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार 596 कोटी रुपये

सतेज पाटील यांचे टोल आंदोलन राजकीय फायद्यासाठीच: धनंजय महाडिक यांची जोरदार टीका

मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम