पुतण्या काकांची भेट! मनोमिलन शक्य अन् अशक्यही; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याची स्क्रिप्ट पडद्यामागे लिहिली जात आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबात सुद्धा एकीची स्क्रिप्ट तयार केली जात आहे. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. इकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पवार फॅमिलीच्या एकीबाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

काका शरद पवार यांचा हात धरून राजकारण(politics) शिकलेल्या अजित पवार यांनी पावणे दोन वर्षांपूर्वी वेगळी वाट धरली. शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि पक्षचिन्ह देखील काढून घेतलं होतं. भाजपबरोबर हात मिळवणी करत अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला होता. यानंतर पावणे दोन वर्षांचा काळ निघून गेला. या काळात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याना फार कमी वेळा सोबत पाहिलं गेलं. पण अलीकडच्या काही दिवसांत दोन्ही नेत्यांच्या तिनदा भेटी झाल्या आहेत.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न देशभरातील लोकांना पडला आहे. जर काका पुतण्या पुन्हा एकत्र आले तर याचा परिणाम महाराष्ट्रापासून दिल्लीच्या राजकारणावर पडेल यात काहीच शंका नाही.

सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की पवार कुटुंब कधी वेगळं नव्हतं. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतील पण यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कधीच बिघडले नाहीत. शरद पवार यांच्या बाबतीत अजित पवारांचा नरमाईचा सूर आहे याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की जर अजितदादा नरम झाले असतील तर याचे सर्वांनी स्वागत केले आहे. यानंतर दोन्ही गट एकत्र होण्याच्या शक्यतेवर त्यांनी सांगितले की अजून असा काही प्रस्ताव नाही. पण शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सांगितले होते की पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे. दोन्ही गटांनी एकत्र येण्यासाठी एका गटाला त्यांची विचारधारा बाजूला ठेवावी लागेल. शरद पवार आणि अजित पवार यावर निर्णय घेतील. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय(politics) परिस्थिती बदलली आहे. या निवडणुकीत चांगले यश मिळवून अजित पवार पावरफुल दिसत असले तरी मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. महायुतीत अजित पवार यांची स्थिती एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा चांगली दिसत असली तरी त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना आजही असे वाटते की शरद पवार सोबत आले तर अनेक राजकीय अडचणी कमी होतील.

दुसरीकडे अजित पवार यांच्या राजकीय उदयानंतर शरद पवार यांच्यासमोर राजकीय अडचणी नव्याने उभ्या राहिल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या राजकीय परिस्थितीत सुप्रिया सुळेंना राजकीय दृष्ट्या प्रस्थापित करण्याचे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी कवायत सुरू झाली आहे. अशात पवार परिवारातील एकता राज्याच्या राजकारणात मोठं वळण ठरू शकते. याचा परिणाम फक्त राज्याच्या राजकारणावरच नाही तर देशपातळीवर इंडिया आघाडीच्या रणनीती आणि संतुलनावर सुद्धा पडू शकतो.

जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र झाले तर राज्यात राष्ट्रवादीची एक राजकीय ताकद पुन्हा निर्माण होऊ शकते. शरद पवार राजकारणातील मातब्बर नेते आहेत. इंडिया आघाडीतही त्यांची गरज आहे. विरोधी आघाडीत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. अशात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होईल.

मागील काही काळापासून शरद पवारांचा गट सत्तेतून बाहेर आहे. तर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. अशात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे अजित पवार काही स्वतः हून सत्ता सोडणार नाहीत. त्यामुळे शरद पवारांनाच तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे शरद पवार खरच असे काही करतील का? एनडीए आघाडीत येतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. परंतु शरद पवार यांचं आतापर्यंतच राजकारण पाहिले तर असे काही होईल याची शक्यता नाही म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

हेही वाचा :

राज्यात चोरट्यांचा सुळसुळाट; हातकणंगलेत तोंडावर स्प्रे मारून दागिने चोरले

टायगर श्राॅफच्या जीवाला धोका, अभिनेत्याला मारण्यासाठी २ लाखांची सुपारी

एसी बसमध्ये जोडपं शारीरिक संबंध ठेवत होते, तेवढ्याच…; पुढे काय झाले ते जाणून घ्या