सातारच्या पावसाची पुनरावृत्ती इचलकरंजीच्या निकालाची पुनरावृत्ती करणार…..?

इचलकरंजी/विशेष प्रतिनिधी : राजांना झोडलं आणि पावसानं(rain) झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशी मराठीत एक प्रश्नांकित म्हण आहे. पाहिजे तेव्हा पडत नाही, आणि नको तेव्हा धो धो कोसळून उभ्या पिकांना झोपवतो म्हणून विदर्भात पावसाला गाभ्रीचा पाऊस म्हणून संयत भाषेत सौम्य शिवी दिली जाते. क्रिकेट सामन्यात भारत जिंकण्याच्या स्थितीत असतानाच पाऊस धारा सुरू होतात आणि मग सामना स्थगित होतो तेव्हा वरून राजाच्या नावानं बोट मोडणारे लाखो क्रिकेट प्रेमी असतात.

पावसाचा “मूड” शब्दात पकडणारे अनेक कवी आहेत. ते पावसाला(rain) नायक बनवतात. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला मतांची बरसात होण्यासाठी पाऊस हवा असतो. त्यांचं आणि पावसाचं नातं काय आहे माहित नाही, शुक्रवारी इचलकरंजी येथे त्यांची महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी प्रचार सभा होती आणि आग्रहाचे निमंत्रण असल्यासारखा पाऊस तेथे नेमका टपकला.

काही वर्षांपूर्वी सातारचे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून ती जिंकली होती. पण अचानक त्यांनी हातातलं “घड्याळ” बाजूला ठेवून कमळ हातात घेताना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तेथे पोटनिवडणूक झाली. भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीनिवास पाटील (निवृत्त सनदी अधिकारी) हे ही निवडणूक लढवत होते.

शरद पवार हे सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले होते. श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्यांची प्रचार सभा झाली. पण शरद पवार यांचे भाषण सुरू व्हायला आणि पावसाच्या कोसळधारा सुरू व्हायला एकच गाठ पडली. लोकांची थोडीफार तारांबळ उडाली पण शरद पवार अंगावर कोसळधारा झेलत भाषण करतच होते.

कोसळणाऱ्या पावसात(rain) भिजत शरद पवार हे भाषण करत आहेत याच्या बातम्या ई-मीडियात आणि प्रिंट मीडियात ठळकपणे आल्या. या त्यांच्या पावसातील भाषणाने श्रीनिवास पाटील यांच्यावर मतांची बरसात झाली आणि ते उदयनराजे यांना हरवून विजयी झाले. त्यांची ती पावसाळी सभा अनेक महिने गाजत होती.

शुक्रवारी तासगाव येथील आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची प्रचार सभा आटोपून शरद पवार हे मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी, जाहीर सभेसाठी वस्त्रनगरी असलेल्या इचलकरंजी शहरात दाखल झाले. वातावरण पावसाळी होते. पण शरद पवार हे भाषण करायला उठले आणि कोसळ धारा सुरू झाल्या. पावसात भिजत भाषण करताना ते म्हणाले की, माझ्या सभेत पाऊस पडला की हमखास आमचा उमेदवार विजयी होतो. निकाल आमच्या बाजूने लागतो. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा विचार सुज्ञ जनतेने करावा असे आवाहन त्यांनी केले.

हवेत उष्मा वाढला, तापमान वाढले की पाऊस पडतो. सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकीय तापमान वाढले आहे आणि म्हणूनच की काय शुक्रवारी पावसानेही आपली हजेरी लावली. काही वर्षांपूर्वी झालेल्या सातारा येथील सभेत पावसात भिजत शरद पवार यांनी भाषण केले होते आणि त्यानंतर त्यांच्या उमेदवारावर मतांचा पाऊस पडला होता. त्याचीच पुनरावृत्ती इचलकरंजी शहरात होणार काय? याचा मात्र अंदाज आता लावता येत नाही.

राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांची एक जाहीर सभा हातकणंगले तालुक्यातील एका गावात झाली होती. तेव्हा राजीव गांधी यांचे भाषण सुरू होताच पावसाचेही जोरदार आगमन झाले होते. सभा ऐकण्यासाठी जमलेल्या गर्दीने वरून पाऊस कोसळत असतानाही सभेचे ठिकाण सोडलेले नव्हते. तेव्हा कोणतीही निवडणूक नव्हती. त्यामुळे मतांचा पाऊस पडण्याचा प्रश्नच नव्हता.

शरद पवार आणि पाऊस यांच्यात जणू काही युतीच आहे. कारण पवारांची भाषणे ही निवडणूक काळातच होत असतात आणि नेमका त्याच वेळी कुठल्यातरी एका भाषणाच्या दरम्यान पाऊस आपली हजेरी लावतो आणि शरद पवार यांना चिंब भिजवून जातो. शुक्रवारी इचलकरंजीत नेमके तेच घडले.

हेही वाचा :

तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं

बिष्णोई टोळीचं पुढचं टार्गेट ठरलं? WhatsApp मेसेजने खळबळ; श्रद्धा वालकरशी कनेक्शन