कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ(University) सिनेटच्या अधिसभेत विद्यापीठाच्या नामविस्तार विरोधी ठराव संमत करण्यात आला असल्यामुळे, आता विद्यापीठाच्या नावात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे आणि म्हणूनच नामविस्तार व्हावा यासाठी आग्रह धरणाऱ्यांनी आपली आंदोलनाची आयुधे खाली ठेवली पाहिजेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील लोकांना “शिवाजी विद्यापीठ” हेच नाव हवे आहे.

दक्षिण महाराष्ट्रात विद्यापीठ (University) स्थापन करण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर हे विद्यापीठ सातारा येथे व्हावे असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना वाटत होते तर वसंतदादा पाटील यांना सांगलीला विद्यापीठ हवे होते. तथापि लोकनेते आणि तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांनी हे विद्यापीठ राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरातच झाले पाहिजे असा ठाम आग्रह धरला होता आणि तो इतरांनी मान्य केला.
त्यानंतर “शिवाजी विद्यापीठ” असे सुटसुटीत नाव देण्याचा निर्णय झाला तेव्हा कोल्हापूरचे पहिले आमदार बी. डी.बराले यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण व्हावे असा आग्रह धरला होता तथापि यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठ हेच नाव कसे योग्य आहे हे त्यांना पटवून दिले होते.
आता गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून केली जाऊ लागली आहे. शिवाजी विद्यापीठ(University) या नावामुळे छत्रपती शिवरायांचा अप्रत्यक्षपणे एकेरी उल्लेख होतो असा युक्तिवाद या संघटनांनी केला आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे पल्लेदार नाव या मंडळींना हवे आहे. नामविस्तारामुळे नेमके काय साध्य होणार हे त्यांनाच माहिती. आहे त्या नावामुळे किमान प्रत्येकाच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपसूक येते. नामविस्तार झाला तर मात्र विद्यापीठाचे नाव संक्षिप्त होणार आहे. आणि त्यामुळे शिवरायांचे नाव पुसले जाणार आहे.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे जे एन यु असे संक्षिप्त नामकरण झालेले आहे, श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे संक्षिप्त नाव एस एन डी टी विद्यापीठ असे झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे संक्षिप्त नाव सीएसएमटी असे झाले आहे.
येणाऱ्या पिढींना मूळ नावे काय हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण संक्षिप्त नावामुळे मूळ नावे पुसली गेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झाला तर लोकांच्याकडून तसा उल्लेख होणार नाही. इतके पल्लेदार नाव घेण्यातही अडचणी आहेत. म्हणूनच नामविस्ताराचा घाट घालण्यामागे संबंधितांचा नेमका उद्देश काय? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा उल्लेख सरसकट लोकांच्याकडून होईल याची हमी नामविस्तार आग्रह धरणाऱ्यांच्याकडून दिली जाणार आहे काय? आहे त्या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर होतो असे कोणीही म्हणणार नाही.

पण अचानक नामविस्ताराचा आग्रह धरला जाऊ लागला आहे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार बोलून दाखवला जाऊ लागला आहे. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी नामविस्ताराला ठामपणे विरोध केलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सिनेटची अधिसभा शनिवारी संपन्न झाली आणि या अधिसभेत शिवाजी विद्यापीठाचा कोणत्याही स्थितीत नामविस्तार करायचा नाही अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तो स्वीकारला. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार भविष्यात केव्हाही होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.
शिवाजी विद्यापीठाचा(University) नाम विस्तार करा या मागणीचा आता आग्रह संबंधित संघटनांनी सोडून दिला पाहिजे. कारण या विद्यापीठाचे नाव अतिशय विचारपूर्वक ठेवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी प्रशांत कोरटकर यांने उधळलेली मुक्ताफळे, त्याच्या विरुद्ध व्यक्त होत असलेल्या संतप्त प्रतिक्रिया, क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर ठेवायची की उखडून टाकायची, असे संवेदनशील विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आणले जात आहेत. वातावरण तापवले जात आहे.
ह्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरून वातावरण तणावपूर्ण बनवायचे असे प्रयत्न सुरू झाले आहेत. या विद्यापीठाचा नामविस्तार करायचा किंवा नाही याचे संपूर्ण अधिकार शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटला आहेत आणि या सिनेटच्या अधिसभेने नामविस्ताराचा मुद्दा खारीज करून टाकला आहे. त्यामुळे आता हा विषय चर्चेच्या पटलावरून पडद्याआड जाण्यास हरकत नाही.
हेही वाचा :
तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले
बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!
सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!