करवीर वासियांना संधी केव्हा, तुमचे आभार मानण्याची….?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेला विधानसभा (assembly) निवडणुकीत मिळालेल्या चांगल्या यशाबद्दल सर्वसामान्य जनतेचे आभार मानणार आहेत. त्यासाठी ते राज्यभर फिरणार आहेत. या आभार दौऱ्याची सुरुवात ते करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन करणार आहेत. त्यासाठी ते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूरला आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या(assembly) तीन जागा त्यांच्या शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. त्याबद्दल ते सर्वसामान्य जनतेचे आभार मानणार असले तरी कोल्हापूरच्या जनतेला त्यांचे आभार मानण्याची संधी केव्हा मिळणार? कोल्हापूरच्या विकासाचा बॅकलॉग (अनुशेष) भरून काढण्याच्या प्रयत्नाची सुरुवात त्यांनी केली तर तो दिवसही दूर नाही.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोल्हापूर ही त्यांची जणू दुसरी कर्मभूमी असल्यासारखे भरपूर दौरे केले होते. एकाच महिन्यात सहा वेळा त्यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता. याशिवाय असा एकही महिना गेला नाही की त्यांचा कोल्हापूर दौरा झाला नाही. तथापि राज्याची सूत्रे त्यांच्या हाती असूनही कोल्हापूरला काही भरीव दिले आहे अशी एकही घोषणा त्यांनी कधी केली नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, कोल्हापूर शहराची हद्द वाढ, राजश्री शाहू स्मारक, पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव प्रदूषण मुक्ती, जयप्रकाश स्टुडिओ, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हे सर्व विकासाशी निगडित असलेले विषय”जैसे थे”स्थितीत आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना यापैकी काही विषयांना सक्रिय या अर्थाने स्पर्श करता आला असता. तसे झाले असते तर करवीरवासीयांना त्यांचे आभार मानण्याची संधी मिळाली असती.

कोल्हापूर शहराची हद्द वाढ हा विषय गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. हद्द वाढ विषयक नवा प्रस्ताव आयुक्तांनी नगर विकास मंत्रालयास पाठवावा(assembly). हद्द वाढ कृती समितीच्या सदस्यांनी मुंबईत माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावे, सरकार या प्रश्नावर सकारात्मक आहे असे एकनाथ शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना अनेकदा सांगितले होते, आश्वासित केले होते. पण हा हद्द वाढीचा विषय त्यांच्याकडून एक इंचानेही पुढे सरकला नाही. त्यांच्या कारकिर्दीत हद्द वाढीचा निर्णय झाला असता तर कोल्हापूरच्या जनतेने पायघड्या अंथरून त्यांचे आभार मानले असते.

सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणार असे वातावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात तयार झाले होते. राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बरोबर तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवतो. खंडपीठ कृती समितीने मुंबईत यावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केव्हा केले होते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून काहीही घडले नाही. सरकार सकारात्मक आहे असेच ते सांगत राहिले.

मराठा चित्रपट सृष्टीचा मानबिंदू असलेल्या जयप्रकाश स्टुडिओ बद्दल त्यांनी निर्णय घेतला होता. हा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेकडे हस्तांतरित करावा असा त्यांनी आदेश काढला होता. प्रत्यक्षात मात्र कुणा एका अमराठी व्यक्तीने हा विषय न्यायालयात नेला. न्यायालयात हा विषय कुजवत ठेवणारी ही व्यक्ती आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शब्दा पलीकडे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्यकाळातच जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न सोडवता येणे सहज शक्य होते. हा स्टुडिओ महापालिकेच्या ताब्यात आला असता किंवा कोल्हापूर चित्रनगरीशी जोडला गेला असता तर या कलानगरीला आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असते.

कोल्हापूरच्या शाहू मिलच्या मोकळ्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे राष्ट्रीय पातळीवरील स्मारक करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. नोडल एजन्सी म्हणून कोल्हापूर महापालिकेत नियुक्त केले होते. तथापि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले पण हे राष्ट्रीय पातळीवरील शाहू स्मारक शासकीय फाईल मधून बाहेरच पडलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या स्मारकाचे भूमिपूजन झाले असते तर शाहूप्रेमींनी त्यांना डोक्यावर घेऊन त्यांचे आभार मानले असते.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा सध्या शासन बैठकीपुरता मर्यादित राहिला आहे. गेल्या अकरा वर्षात मिळकती संपादनाची सुरुवातही झालेली नाही. अजून मधून केव्हातरी एखादी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होते. विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि घरमालकांची बैठक घेतली जाते पण पुढे काहीच घडत नाही. असे कितीतरी विषय आहेत(assembly). मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना ते सहज मार्गी लावता आले असते. पण त्यांची बोलण्यातली सकारात्मकता कृतीत कधीच आली नाही. त्यामुळेच करवीर वासियांच्याकडून आभार व्यक्त करून घेण्याची संधी त्यांनी गमावली आहे.

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. नगर विकास मंत्रालयासह काही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात तीन आमदार मिळालेले आहेत. इतके चांगले यश कोल्हापूरच्या जनतेने मिळवून दिले म्हणून त्यांनी आपल्या आभार दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून करायचे निश्चित केले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.
कोल्हापूरचे विकासाशी निगडित असलेले प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नाचा प्रारंभ त्यांनी कोल्हापुरातून केला तरी कोल्हापूरची जनता त्यांचे आभार मानण्यासाठी मागे राहणार नाही.

हेही वाचा :

धक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या जोतिबा डोंगरावरील प्रसादात आढळलं ब्लेडचं पान

“मला आता यमराज हवा”! आजीच्या उत्तरावर सोशल मीडिया हादरलं, पण प्रश्न काय? Video Viral

राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘या’ निर्णयाने दिला सर्वांना धक्का