‘ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर…’, खळबळजनक विधान करत नितेश राणे म्हणाले…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जुने मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरु लागल्या आहेत. दोन्ही ठाकरेंकडून एकमेकांना एकत्र येण्याची साद घातली जात असल्याने राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात अशी चर्चा जोर धरु लागलेली असतानाच या संभाव्य युक्तीच्या शक्यतांवर राजकीय मतंही समोर येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी एक वेगळंच विधान केलं आहे.

राज ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बंधू उद्धव ठाकरेंबरोबर जुळवून घेण्याचे संकेत दिले. ‘‘झाले ते झाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण किरकोळ आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे या मला फार कठीण गोष्टी वाटत नाहीत. विषय फक्त इच्छेचा आहे,’’ असं सूचक विधान राज यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीसंदर्भातील प्रश्नाला दिलं. त्यामधूनच पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. तसेच मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना उत्तर देण्याआधी रश्मी वहिनींची परवानगी घेतली होती का हे विचारावं, असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा नाही तर रश्मी ठाकरेंचा विरोध होता असा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये वाद होता का? उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ते रश्मी ठाकरेंना मान्य आहे का? त्यांना विचारलं पाहिजे राज ठाकरेंबरोबर जाण्याची इच्छा आहे का?

आम्ही पुन्हा टाळी देण्यास तयार आहोत असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना (राज ठाकरेंचा) त्रास आहे की घरातून विरोध आहे हे उद्धव ठाकरेंनाच विचारा,” असं नितेश राणे म्हणाले. यावर पुढे बोलताना, “ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला आणि त्यांना (ठाकरेंना) जवळून पाहिलं आहे त्यांच्यापैकी आम्ही एक आहोत. त्यातून काय ते समजून घ्या. माझ्या विधानाला विरोध करायला त्यांना सांगून बघा,” असंही नितेश राणे म्हणाले.

म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व निर्णय रश्मी ठाकरे घेतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा सवाल नितेश राणेंना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणेंनी, “महाविकास आघाडीचं सरकार कोण चालवत होतं? ठाकरेंच्या सरकार कोण चालवत होतं?” असा उलट प्रश्न केला.

“‘मातोश्री’पासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वैभव चेंबर्समध्ये सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकार का जायचे? हे विचारा त्यांना. तिथे रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर बसून सर्व गोष्टी करायचे. हे मी पहिल्यांदा बोललेलो नाही. हे सर्वांना माहिती आहे. आम्ही फक्त फॅक्ट सांगण्याची हिंमत ठेवतो,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार की नाही हे रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर अवलंबून असल्याचा दावाही नितेश राणेंनी केला आहे. “(राज आणि उद्धव) ठाकरेंनी एकत्र यावं की नाही हे मी ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या (रश्मी ठाकरेंच्या) इच्छेवर अवलंबून आहे. जे जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना सर्व काही माहित आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

‘…तर कारवाई केली जाईल’; फेसबुक, इंस्टाग्राम वापरणाऱ्यांना पोलिसांचा थेट इशारा

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष, बालपणीचा मित्रही बायकोला मिळाला

दुपारी भात खाल्ल्यानंतर सुस्ती का येते? ही झोप आवरायची कशी