कामातील व्यत्यय दूर करताना…

कोणत्याही कामाबाबतची आपली उत्पादकता वाढवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे लक्ष विचलित होऊ न देणे. तसे झाले तरच तुम्ही तुमचा वेळ (time)आणि लक्ष खरोखरच महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करू शकता.

  • प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

कोणत्याही कामाबाबतची आपली उत्पादकता वाढवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे लक्ष विचलित होऊ न देणे. तसे झाले तरच तुम्ही तुमचा वेळ (time)आणि लक्ष खरोखरच महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करू शकता. तुम्ही शालेय विद्यार्थी असा किंवा करिअरची जबाबदारी पेलणारे एखादे नोकरदार असा, कामावरचे लक्ष टिकून राहण्यासाठी ते विचलित होऊ न देणे, हे हल्लीच्या काळातील महत्त्वाचे कौशल्य ठरते आहे.
दुर्दैवाने, इतर गोष्टींबरोबरच तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपले लक्ष विचलित होण्याचे प्रमाण वाढले असून, हा प्रश्‍न चिंताजनक पातळी गाठतो आहे. सरासरी ८४.४ टक्के लोकांना लक्ष विचलित होत असल्याने कामात व्यत्यय येण्याची समस्या भेडसावते आहे.

कामात येणारे व्यत्यय किंवा अडथळे दूर कसे करायचे? लक्ष अधिक केंद्रित कसे करायचे? हे जाणून घेण्याआधी आपण हे समजून घ्यायला हवे की, आपला मेंदू लक्ष केंद्रित असण्याचा काळ आणि लक्ष विचलित होण्याचा काळ यामध्ये प्रवास करत असतो. त्यामुळे आपण लक्ष केंद्रित होण्याचा काळ अधिकाधिक वाढवण्यावर भर देऊ शकतो.

मात्र, हे करत असतानाच आपले चित्त विचलित होण्याचा धोका वाढत असतो. हे सर्व समजून घेतले की, आपले रोजचे वेळापत्रक वास्तवाच्या जवळ जाणारे होते. पुढे पुढे या गोष्टीची सवय होते आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स खालीलप्रमाणे-

आणखी ५ मिनिटे

जेव्हाही काम थांबवण्याचा मोह होतो, लक्ष लागत नाही असं वाटतं, तेव्हा स्वतःला ‘आणखी ५ मिनिटे’ असं सांगा. हा वेळ कमी वाटत असला, तरी बऱ्याचदा हा वेळ पुरेसा ठरतो. आणखी ५ मिनिटे ते काम करत राहिल्याने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होतं आणि पुढे काम करणं सोपं होतं. ५ मिनिटं अधिक धावणं, अभ्यास करणं, वाचन करणं या सवयीने ते काम अधिक वेळ करता येतं.
वेळ ठरवणे

विशिष्ट कामासाठी वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत तेच काम करा. त्यामुळे आपोआप इतर व्यत्यत कमी होण्यास मदत होते. मुलांच्या अभ्यासासाठी हा काळ सलग २५ मिनिटे असा असू शकतो किंवा मोठ्यांसाठी सलग दोन तास असाही असू शकतो. त्या वेळेत तुम्ही दुसरे कोणतेही काम न करता पूर्ण एकाग्र राहणे आवश्‍यक आहे हे लक्षात ठेवा.


‘ट्रिगर्स’ टाळा

स्मार्ट फोनवर येणारे नोटिफिकेशन्स, विविध ‘अलर्ट’ यांमुळे आपले लक्ष विचलित होण्यात भर पडते. असे सर्व अडथळे म्हणजेच लक्ष विचलित करणारे ‘ट्रिगर्स’ टाळा. यासाठी फोन बंद करा. तुमच्या कामाची वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत शक्यतो कोणालाही भेटू नका.

वेळ वाया घालवणे

हे लक्षात घ्या की, कामातून विश्रांती घेणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही. हा वेळ आनंदाचा, मजेचा, स्वतःसाठी नवी ऊर्जा घेण्याचा, शांततेचा असू शकतो. त्यामुळे आपला वेळ वाया जातो आहे, असा विचार करू नका. काम सांभाळून मजेचा वेळ ठरवा आणि त्यात मनमुराद जगा. त्यामुळे नंतर काम नीटपणे होईल.

हेही वाचा :

शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त

कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात

पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !