महाराष्ट्राच्या मँचेस्टर मध्ये विजयाचा “धागा” कुणाच्या हाती?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मँचेस्टर(manchester) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराला महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतरची होणारी विधानसभा निवडणूक पहिली आहे. ही निवडणूक महायुतीचे डॉक्टर राहुल आवारे विरुद्ध महाविकास आघाडीचे मदन कारंडे यांच्यात रंगणार असली तरी महायुतीला या मतदारसंघात बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. एकच नाव असलेले दोन उमेदवार या मतदारसंघात आहेत. नावातील साधर्म्य हे महायुतीच्या उमेदवाराला फायदेशीर ठरणार काय? याची चर्चा सुरू झाली नाही तरच नवल म्हणावे लागेल. या निवडणुकीत आव्हाडे घराण्यातील तिसरी पिढी उतरली आहे आणि या पिढीने भारतीय जनता पक्षाचे कमळ हातात घेतले आहे.

महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर राहुल आवाडे हे उमेदवार असले तरी अजितदादा पवार गटाच्या विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली आहे. शरद पवार गटाचे मदन कारंडे हे आवाडे विरुद्ध प्रबळ उमेदवार मानले जातात. पण त्यांनाही नाम साम्यतेच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कारण सातारा येथील मदन कारंडे या नावाच्या व्यक्तीने या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एका मतदारसंघात दोन उमेदवारांच्या नावाचा साम्य असल्यामुळे एका अपक्ष उमेदवाराला आश्चर्यात टाकणारी मते मिळाली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठी अडचण निर्माण करणारी ही खेळी कोणी केली आहे समजत नाही. या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुहास अशोक जांभळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तथापि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या वीस मिनिटांमध्ये जांभळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत डॉक्टर राहुल आवाडे विरुद्ध शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यातच आहे.

या इचलकरंजी(manchester) मतदारसंघावर अगदी सुरुवातीपासून आवाडे कुटुंबीयांचा प्रभाव आहे. के एल मलाबादे यांच्यासारखा एखादा दुसरा अपवाद वगळता आवाडे यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेली दिसते. भारतीय जनता पक्षाचे सुरेश हाळवणकर 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांना पहिल्या निवडणुकीत 49% तर दुसऱ्या निवडणुकीत 47 टक्के मते मिळाली होती. तर प्रकाश आवाडे यांना 37% आणि 39% मतदान झाले होते.

मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि 58% मते मिळून ते विजयी झाले. ते गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य होते. त्याचा फायदा त्यांना त्यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल आवाडे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी झाला. इथे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना भाजपने भविष्यात राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन शांत बसवले आहे. आवाडे घराण्याचे या मतदारसंघात संस्थात्मक काम मोठे आहे. अनेक सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. या कुटुंबाला दोन वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली होती.

‌ इचलकरंजीचे(manchester) नगराध्यक्ष पद किती तरी वर्षे त्यांच्याच घरात होते. त्यांच्याकडून इचरकंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याची आजतागायत समाधानकारक सोडवणूक झालेली नाही. सध्या या शहराचा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने दूधगंगा नदीचे पाणी या शहराला मिळावे म्हणून सुळकुड योजना मंजूर केली होती पण तिला अनेक राजकीय नेत्यांचा प्रकरण विरोध होता आणि आजही आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी कडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असे आश्वासन दिले गेले आहे.

सध्या तरी या मतदारसंघाचा राजकीय विचार केला तर येथे भाजपचे कमळ फुलेल असे अंदाज बांधले व्यक्त केले जात आहेत. महाविकास आघाडीचे अर्थात शरद पवार गटाचे मदन कारंडे हे सुद्धा तसेच तगडे उमेदवार आहेत. पण त्यांच्याच नावाचा आणखी एक उमेदवार इथल्या रिंगणात असल्यामुळे त्या अपक्ष उमेदवाराचे उपद्रव मूल्य किती असेल हे आत्ता तरी सांगता येत नाही. इचलकरंजीचे नेते आणि माजी आमदार अशोक जांभळे यांचे चिरंजीव सुहास जांभळे हे नाराज असले तरी तुतारीच्या प्रचारात उतरलेले दिसतात. महायुतीचे बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे हे सुद्धा त्रासदायक ठरू शकतात. या मतदारसंघात हायटेक प्रचार सुरू आहे आणि विजयाचा”धागा”कोणाच्या हाती बांधला जाणार हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.

हेही वाचा :

भ्रष्ट यंत्रणेने घुसखोरांना बनवले अधिकृत नागरिक

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी’;

“केएल राहुलच्या भावनिक वक्तव्यात विराटची आठवण; RCB च्या अपूर्ण स्वप्नाची खंत व्यक्त केली”