तुरुंगात आरोपी झोकात असे आरोप का होतात?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की कंपनीकडून खंडणीची मागणी, सुरक्षा रक्षकाला मारहाण या एकत्रित गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह इतर संशयित आरोपींच्या विरोधात पोलिसांनी तब्बल दीड हजार पानांचे दोषारोप पत्र नुकतेच दाखल केले आहे. आता हा राज्यभर गाजत असलेला, गाजलेला खटला बीड जिल्हा न्यायालयाच्या “मोक्का” विशेष न्यायाधीशांसमोर नजीकच्या काळात सुनावणीसाठी येईल. या खटल्यात गुन्ह्यामध्ये कमीत कमी सहभाग असलेल्या संशयित आरोपीला(accused) माफीचा साक्षीदार केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडसह त्याचे साथीदार बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींना किंवा वाल्मीक कराड याला अंडा सेल असलेल्या कारागृहात ठेवण्यात यावे ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आलेली नाही. सर्व संशयित आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेले आहे हा दमानिया यांनी केलेला आरोप बे दखल करता येण्यासारखा नाही.

संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी सुद्धा तुरुंगातील काही कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांच्याकडून संशयित आरोपींना(accused) सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा पुरवल्या जात असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नावे घेऊन असे आरोप होत असतील तर तुरुंग प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि संबंधित कर्मचाऱ्यांची बदली तातडीने केली पाहिजे. असे झाले नाही तर नातेवाईकांच्या कडून केला जाणारा आरोप हा सत्याच्या आधारावर असल्याचे म्हणता येईल. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाच्या विरुद्ध अशा प्रकारचे आरोप गेल्या दीड दोन महिन्यांपासून होत आहेत आणि त्याबद्दल एकदाही खुलासा प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. प्रशासनाला हे आरोप अप्रत्यक्षपणे मान्य आहेत असे म्हणता येऊ शकते.

वाल्मीक कराड हा महायुती मधील विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांची सावली असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे प्रशासनावर अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांचा दबाव आहे असे सुचित होते. तुरुंग प्रशासनावर अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असतील तर पोलीस महानिरीक्षकांनी त्याची तातडीने दखल घेऊन वाल्मीक कराड यांच्यासह सर्वच आरोपींची रवानगी मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद येथील तुरुंगात तातडीने केली पाहिजे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तुरुंगामध्ये सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील तर कायद्याचे भय कोणालाही राहणार नाही.

वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध न्यायालयात दाखल झालेला खटला हा महाराष्ट्रासाठी हाय व्होल्टेज आहे. संपूर्ण राज्याच या खटल्याच्या सुनावणी कडे लक्ष असणार आहे. सुमारे दीड हजार पानांच हे दोषारोप पत्र आहे. याचा अर्थ या खटल्यात साक्षीदारांची संख्या मोठी आहे. प्रत्यक्ष खटला सुनावणीला येईल तेव्हा साक्षीदारांच्या वर दबाव येण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणूनच हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालवण्यात यावा. अशा प्रकारचे गाजलेले खटले यापूर्वी शेजारच्या जिल्ह्यामध्ये चालवले गेलेले आहेत. सध्यातरी हा खटला केज तालुक्याच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे मात्र हा खटला बीड जिल्हा व सत्र न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी दोषा रोप पत्र दाखल करणाऱ्या पोलिसांनी केलेली आहे.

आता त्यावर राज्य शासनाने उच्च न्यायालयास विनंती केली तर हा खटला केजच्या बाहेर सुनावणीसाठी घेतला येईल.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या खटल्यातील मुख्य आरोपी(accused) वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप केला आहे तर मंत्री पंकज भोयर यांनी त्याचा इन्कार केला आहे. वास्तविक राज्याच्या तुरुंग प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी याबद्दलचा खुलासा करणे उचित होणार आहे.

हत्या आणि खंडणी या दोन गंभीर गुन्ह्यांचा एकत्रित तपास करणे ही साधी बाब नाही. पण तरीही अवघ्या 80 दिवसात आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्रात दाखल करण्यात आले आहे हे विशेष. दोषारोप पत्र दाखल करण्यास विलंब झाला असता तर संबंधित आरोपींनी त्याचा फायदा जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाचा घेतला असता. हा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल असे यापूर्वीच राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

हा खटला सरकारच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम चालवणार आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल सुषमा अंधारे वगैरे विरोधी नेत्यांनी केलेला विरोध हा अनाकलानीय आणि राजकीय स्वरूपाचा आहे. तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास अतिशय गोपनीय पद्धतीने केलेला आहे आणि त्याबद्दलची माहिती बाहेर जाणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी पुरेपूर दक्षता घेतली होती. तथापि तपासातील महत्त्वाचे मुद्दे तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला दिले असते तर लोकांचा आणखी विश्वास वाढला असता. केलेला तपास हा योग्य आहे की त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत हे खटल्याच्या निकालाच्या वेळीच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये….

मार्च महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, शनीची राहील कृपादृष्टी

चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट