पूर्व पाकिस्तान नंतर आता बलुचिस्तान स्वतंत्र होईल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेख मुजीबुर रहमान यांनी पाकिस्तान विरोधी उठाव केल्यानंतर इसवी सन 1971 मध्ये भारताच्या लष्करी सहाय्याने मूळ पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान वेगळा करण्यात आला. आज तो बांगलादेश म्हणून ओळखला जातो आहे. आता पाकिस्तानचाच एक भाग असलेल्या बलुचिस्तान मधील सर्वसामान्य जनतेने स्वतंत्र(independent) बलुचिस्तानची मागणी केली आहे.

हीच मागणी घेऊन बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्करावर सशस्त्र हल्ले सुरू केले आहेत. गेल्या आठ दिवसात बी एल ए ने तीन हल्ले करून पाकिस्तानच्या लष्करासमोर तसेच राज्यकर्त्यांच्या समोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. कदाचित नजीकच्या काळात बलुचिस्तान हा स्वतंत्र(independent) देश म्हणून उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इसवी सन 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान आणि भारत हे दोन स्वतंत्र देश म्हणून उदयास आले. पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर अवघ्या 24 वर्षात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आज तो बांगलादेश म्हणून ओळखला जातो.

पाकिस्तानच्या लष्करी सत्तेने पूर्व पाकिस्तानातील जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते. तेव्हा शेख मुजीबुर रहमान यांनी बांगला मुक्ती वाहिनी च्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनी भारतीय लष्कर बांगलादेशमध्ये घुसवले आणि केवळ आणि केवळ भारताच्या लष्करी हस्तक्षेपातून स्वतंत्र बांगलादेश उदयास आला.

बांगलादेशातील जनता उपकाराची फेड बांगलादेशातील हिंदूंच्यावर अत्याचार करून अपकाराने करत आहे. सध्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आश्रयाला आहेत. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी पहिल्या वर्षांपासून बलुचिस्तान मधील जनता आम्हालाही स्वतंत्र देश हवा आहे म्हणून मागणी करत होती. पाकिस्तानच्या लष्करी सत्तेने, तर कधी लष्कराच्या सहाय्याने पत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी बलुचिस्तान मधील सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते.

त्यातून स्वतंत्र(independent) देशाची मागणी करणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही अस्तित्वात आली. तथापि या संघटनेला पाकिस्तानने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या संघटनेवर बंदी आणली होती. पण आता ही लिबरेशन आर्मी पुन्हा रस्त्यावर उतरली असून स्वतंत्र बलुचिस्तानचे मागणी करू लागली आहे.

आठ दिवसापूर्वी क्वेटा येथून पेशावर कडे जाणाऱ्या एका रेल्वेचे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी अपहरण केले होते. या रेल्वेतील पाकिस्तानच्या लष्करी जवानांना या बंडखोरांनी ठार मारले होते शिवाय काही प्रवाशांना नाही गोळ्या घातल्या होत्या. त्यावेळी आम्ही हा अपहरणाचा दहशतवादी खेळ लष्कराच्या कारवाईने संपुष्टात आणला असा दावा पाकिस्तानचे राज्यकर्ते करू लागले होते.

रेल्वेचे अपहरण केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी म्हणजे दिनांक 16 मार्च रोजी बलुचिस्तान मधील नौशकी जिल्ह्यात बी एल ए ने पाकिस्तान लष्करावर हल्ला करून 90 सैनिकांना ठार मारले. लष्कराचा ताफा क्वेटा येथून तपथानकडे निघाला होता. या लष्करी वाहनांवर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची धडक देऊन महाभयंकर स्फोट घडवून आणला. त्यामध्ये पाकिस्तानचे 90 सैनिक ठार झाले. या हल्ल्यानंतर बी एल ए ने आणखी काही वाहनांवर हल्ले करून त्यातील पाक सैनिकांना ठार मारले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने गेल्या आठ दिवसात केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान हादरला आहे.

बलुचिस्तान प्रांतात प्रचंड प्रमाणावर खनिजे आहेत. या खनिजांवर चीनचा डोळा आहे. सध्या याच बलुचिस्तान मधील खनिजांवर कब्जा मिळवण्यासाठी चीनकडून पाकिस्तानला आर्थिक रसद दिली जाते. चीनकडून बलुचिस्तान हा गिळंकृत केला जाईल अशी भीती तेथील जनतेला आहे. आणि म्हणूनच आम्हाला स्वतंत्र(independent) करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते आहे. या मागणीतूनच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेचा जन्म झालेला आहे. आणि आता या संघटनेने पाकिस्तानला ललकारले आहे. आम्हाला स्वातंत्र्य द्या अन्यथा लष्करी कारवाईला सामोरे जा असा संदेशच या आर्मीने पाकिस्तान सरकारला दिलेला आहे.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही कमालीची खालावलेली आहे. आर्थिक सहाय्यासाठी हाती कटोरा घेऊन पाकिस्तानचे राज्यकर्ते जागतिक बँकेच्या दारात उभे आहेत तसेच श्रीमंत इस्लामिक राष्ट्रांनी आर्थिक मदत करावी अशी भीक मागितली जात आहे. आमच्याकडे असलेले अणुबॉम्ब तंत्रज्ञान तुमच्या संरक्षणासाठी दिले जाईल असे आश्वासनही गुप्तपणे पाकिस्तान कडून दिले जात आहे. तथापि एकाही इस्लामिक राष्ट्राने पाकिस्तानला आर्थिक मदत केलेली नाही.

आता फक्त चीन हाच त्यांचा आधार आहे. आणि चीनला मौल्यवान खनिजे हवी आहेत जे बलुचिस्तान प्रांतात आहेत. ज्या पद्धतीने बी एल ए ने पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले सुरू केले आहेत ते पाहता नजीकच्या काळात हे हल्ले वाढत जातील. त्यातून बलुचिस्तान हा एक नवा देश म्हणून उदयास येऊ शकतो. पाकिस्तानची आजची अवस्था पाहता या देशाचे आणखी काही तुकडे भविष्यात पडले तर आश्चर्य वाटू नये.

हेही वाचा :

काल अयोध्येचा बाबर आज औरंग्याची कबर

लेकीचा जबरदस्ती फोटो घेताच चिडला रोहित शर्मा, पुढे काय घडलं? Video व्हायरल

विश्वास ठेवणं कठीण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर…